म्युकरमायकोसिस व तिसऱ्या लाटेच्या प्रतिबंधासाठी प्रयत्न : आजपासून वरिष्ठ अधिकारी गाव भेटीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 23:41 IST2021-05-26T23:40:34+5:302021-05-26T23:41:09+5:30
mucormycosis and third wave म्युकरमायकोसिस व तिसऱ्या लाटेच्या प्रतिबंधासाठी गुरुवारपासून जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी ग्रामीण भागाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी बुधवारी सायंकाळी टास्क फोर्सच्या बैठकीनंतर यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत.

म्युकरमायकोसिस व तिसऱ्या लाटेच्या प्रतिबंधासाठी प्रयत्न : आजपासून वरिष्ठ अधिकारी गाव भेटीला
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : म्युकरमायकोसिस व तिसऱ्या लाटेच्या प्रतिबंधासाठी गुरुवारपासून जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी ग्रामीण भागाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी बुधवारी सायंकाळी टास्क फोर्सच्या बैठकीनंतर यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत.
गेल्या काही दिवसांत ग्रामीण भागांमधील रुग्ण संख्येत वाढ होत आहे. तसेच म्युकरमायकोसिस व लहान मुलांच्या आजारांमध्येदेखील भर पडत आहे. पावसाळा तोंडावर असताना तिसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यासाठी प्रत्येक गावात जाऊन तेथील पायाभूत सुविधा बळकट करणे, आरोग्य यंत्रणेला गतिशील करणे, लसीकरणाला गती देणे, म्युकरमायकोसिस आजाराबाबत जनजागृती करणे, विशेषतः शेतकरी वर्गामध्ये ज्यांचा मातीशी शेतीशी संबंध येतो अशा सर्वांना या आजारापासून दूर ठेवण्यासाठी जनजागृती करणे अनिवार्य आहे. यासाठी बुधवारी दिवसभराच्या बैठकांनंतर आरोग्य विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कामठी, मौदा, उमरेड, कुही, भिवापूर, सावनेर, काटोल, कळमेश्वर, नरखेड, हिंगणा, नागपूर ग्रामीण, रामटेक, पारशिवनी अशा १३ चमूंचे गठण करण्यात आले आहे.
उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तसेच कार्यकारी अभियंता दर्जाचे अधिकारी या टीमचे प्रमुख असून त्यांच्यासोबत ग्रामपंचायतनिहाय लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सरपंच, सदस्य, पोलीस पाटील, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, तलाठी, कोतवाल, स्वस्त धान्य दुकानदार, स्थानिक खासगी वैद्यकीय व्यावसायिक, शिक्षक, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका उपस्थित राहणार आहेत. कोरोना तसेच म्युकरमायकोसिस आजाराबाबतचे जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनात जिल्हा माहिती कार्यालयाने तयार केलेले व्हिडिओ सर्व प्रथम गावागावांमध्ये दाखविले जाणार आहे. त्यानंतर अधिकारी मार्गदर्शन करणार असून दररोजचा अहवाल जिल्हाधिकारी व पालकमंत्री यांना सादर केला जाणार आहे. ग्रामीण भागातील कोरोना बाधितांची संख्या कमी करणे, संभाव्य तिसऱ्या लाटेपासून संरक्षण करण्यासाठी ही रणनीती आखण्यात आली आहे. उद्यापासून जिल्ह्याच्या सर्व भागात त्याचा अंमल केला जाणार आहे.