लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उच्च व तंत्रशिक्षण विभागाला राज्यातील महाविद्यालये सुरू करण्यासंदर्भात अद्यापही ठोस निर्णय घेता आलेला नाही. महाविद्यालयांत विद्यार्थी नसताना, उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत राज्यातील विद्यापीठांमध्ये जाऊन तेथील समस्या ऐकून घेणार आहेत. या अंतर्गत नागपुरात ५ फेब्रुवारी रोजी तक्रार निवारण सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात विद्यार्थी, पालक, शिक्षक, प्राचार्य, शिक्षकेतर कर्मचारी, शैक्षणिक संस्थांचे संचालक आपल्या अडचणी मांडू शकणार आहेत. विशेष म्हणजे, यासाठी विद्यापीठाने ‘ऑनलाइन’ निवेदन मागविले असून, बुधवारपर्यंत संकेतस्थळावर ते दाखल करता येणार आहे.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालय @ नागपूर हा उपक्रम शुक्रवार ५ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे. वसंतराव देशपांडे सभागृह येथे दुपारी १२ ते सायंकाळी पाच या कालावधीत ते तक्रारी ऐकून घेतील. यासाठी संबंधितांना त्यांच्या अडचणी, तसेच विद्यापीठ, प्रशासन किंवा मंत्रालय स्तरावरील प्रलंबित प्रश्न ‘ऑनलाइन’ मांडायचे आहे. प्रत्यक्ष उपस्थित राहूनही समस्या मांडता येणार आहे. त्यासाठी आयोजनस्थळी ‘टोकन’ प्रणाली असेल. मंत्रालयातील सर्व वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित राहतील, अशी माहिती कुलगुरू डॉ.सुभाष चौधरी यांनी पत्रपरिषदेदरम्यान दिली. यावेळी प्र-कुलगुरू डॉ.संजय दुधे, कुलसचिव डॉ.अनिल हिरेखण, डॉ.आर.पी.सिंग, डॉ.अभय मुद्गल, डॉ.राजू हिवसे, डॉ.शरद सूर्यवंशी, डॉ.किशोर काळे प्रामुख्याने उपस्थित होते.
१५ फेब्रुवारीपासून महाविद्यालयांना सुरुवात होण्याची शक्यता
दरम्यान, महाविद्यालये सुरू करण्याबाबत अद्यापही अंतिम निर्णय झाला नसला, तरी लवकरात लवकर वर्ग सुरू करावे, अशी मागणी शैक्षणिक क्षेत्रातून होत आहे. १५ फेब्रुवारीपासून महाविद्यालयांना सुरुवात होऊ शकतील, असे संकेत उच्च व तंत्रशिक्षणमंत्र्यांनी दिले असून, लवकरच अंतिम निर्णय होण्याची शक्यता असल्याची माहिती कुलगुरूंनी दिली.