नागपूर विभागातील शिक्षण विभाग लाचखोरीत पाचवा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2019 11:14 AM2019-11-01T11:14:08+5:302019-11-01T11:16:53+5:30

पोलीस, महसूल, जिल्हा परिषदेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांसारखीच लाचेची मागणी करून नागपूर विभागाच्या शिक्षण विभागातील मंडळींनी लाचखोरीत पाचवे स्थान गाठले आहे.

The education department in the Nagpur region is fifth in bribery! | नागपूर विभागातील शिक्षण विभाग लाचखोरीत पाचवा !

नागपूर विभागातील शिक्षण विभाग लाचखोरीत पाचवा !

Next
ठळक मुद्देफॉरेस्ट, एनएमसीला मागे टाकले विभागात एकूण ८३ ट्रॅप, ११४ गजाआड

नरेश डोंगरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पवित्र मानला जाणाऱ्या शिक्षण विभागाला लाचखोरीची उधळी लागली आहे. वरकमाईसाठी चटावलेल्या आणि लाचखोरीसाठी कुपरिचित असलेल्या पोलीस, महसूल, जिल्हा परिषदसारख्या विभागांमध्ये शिक्षण विभागाचाही समावेश झाला आहे. पोलीस, महसूल, जिल्हा परिषदेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांसारखीच लाचेची मागणी करून नागपूर विभागाच्या शिक्षण विभागातील मंडळींनी लाचखोरीत पाचवे स्थान गाठले आहे. विशेष म्हणजे, गेल्या दहा महिन्यात शिक्षण विभागाने फॉरेस्ट, एनएमसी, वीज मंडळालाही मागे टाकले आहे.
राज्यात दरवर्षी २८ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर या कालावधीत दक्षता व जनजागृती सप्ताह साजरा केला जातो. या आठवड्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) तर्फे विविध उपक्रम, कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. भ्रष्टाचार करणार नाही आणि भ्रष्टाचार होऊ देणार नाही, अशी शपथ प्रत्येक विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना दिली जाते. मात्र, भ्रष्टाचाराची शपथ खाणारी मंडळी ‘लाच खाण्याघेण्याबाबत’ त्याला फारसे गांभीर्याने घेत नाही, हे दरवर्षी एसीबीकडून केल्या जाणाऱ्या कारवायातून उघड होते. पुन्हा एकदा ते अधोरेखित झाले. १ जानेवारी ते ३१ ऑक्टोबर २०१९ या कालावधीत एसीबीने नागपूर विभागाच्या महसुली क्षेत्रातील सहा जिल्ह्यात तब्बल ८७ सापळे लावले. त्यात ११४ भ्रष्टाचारी अडकले. गरजू व्यक्तींना अडवून त्याचे काम करण्यासाठी कुणी पाच हजार रुपये मागितले तर, कुणी चक्क लाखोंची मागणी केली. नुसतीच मागणी केली नाही तर लाचेची रक्कम स्वीकारताना ते पकडलेही गेले. या भ्रष्ट अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कुठे आपले दलाल नेमून ठेवले होते. ते त्यांच्याच हाताने रक्कम स्वीकारत होते. या दलालात कुणी चहा-पान टपरी चालविणारा होता तर, कुणी साहेबाच्या कार्यालयाच्या आजूबाजूला घुटमळणारा आहे.
विशेष म्हणजे, सर्वाधिक लाचेचे २९ सापळे नागपूर शहरात तर सर्वाधिक कमी पाच सापळे बापूंच्या वर्धा जिल्ह्यात लागले. गेल्या वर्षी (सन-२०१८) सर्वाधिक २७ सापळे चंद्रपूर जिल्ह्यात तर सर्वाधिक कमी १२ सापळे वर्धा जिल्ह्यात लागले होते.

पोलीसच अव्वलस्थानी !
एसीबीच्या सापळ्यात अडकेल्या विभागांमध्ये नेहमीप्रमाणे याहीवर्षी पोलीस विभागच अव्वलस्थानी राहिला. पहिल्या पाच लाचखोर विभागांपैकी पोलीस विभागातील १८ जणांवर एसीबीने कारवाई करून त्यांच्या दलालांसह २४ जणांना पकडले. महसूल विभागात १६ सापळे लावून दलालांसह २२ जणांना पकडण्यात आले. जिल्हा परिषदेतील ७ भ्रष्टाचाऱ्यांसह ९ जणांना जेरबंद करण्यात आले. वीज मंडळातील ८ तर शिक्षण विभागात ५ सापळे लावून ६ जणांना पकडण्यात आले. त्यांच्या पाठोपाठ फॉरेस्ट, वित्त विभाग, पंचायत समिती, नगर परिषद आणि आरोग्य विभागाची मंडळी लाच घेताना पकडली गेली. नॅशनल हाय वे च्या अधिकाऱ्यांच्या नावाने सर्वाधिक २२ लाखांची लाच मागून १२ लाखांचा चेक घेणारा एक दलाल पकडला गेला, ही यावर्षीची एसीबीची सर्वात मोठी कारवाई ठरली. कृषी, फूड अ‍ॅन्ड ड्रग, नगर रचना, एनएमसी, समाज कल्याण आणि आरटीओतील कोणताही अधिकारी, कर्मचारी एसीबीच्या हाती लागला नाही, हे विशेष !

Web Title: The education department in the Nagpur region is fifth in bribery!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.