फसवणूक प्रकरणी ईडीने केली लक्ष्मी नारायण कौशिक यांना अटक
By मोरेश्वर मानापुरे | Updated: March 9, 2024 21:43 IST2024-03-09T21:42:49+5:302024-03-09T21:43:04+5:30
वाढवलेल्या किमतीत कमी दर्जाच्या कापसाची खरेदी.

फसवणूक प्रकरणी ईडीने केली लक्ष्मी नारायण कौशिक यांना अटक
नागपूर : अंमलबजावणी संचालनालय (ईडी), नागपूरच्या अधिकाऱ्यांनी लक्ष्मी नारायण कौशिक यांना ६ मार्च रोजी मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायदा (पीएमएलए), २००२ च्या तरतुदींनुसार फसवणूक केल्याप्रकरणी अटक केली. त्यांना ७ रोजी नागपुरातील विशेष पीएमएलए न्यायालयात हजर करण्यात आले. या प्रकरणी सुनावणी होऊन त्यांना न्यायमूर्तींनी चौकशीसाठी सात दिवसांच्या ईडी कोठडीत पाठविण्याचे आदेश दिले.
गुजरात येथील वापी पोलीस ठाण्यांतर्गत आयपीसी, १८६० च्या विविध कलमांखाली नोंदवलेल्या दोन एफआयआरच्या आधारे ईडीने तपास सुरू केला. चौकशीदरम्यान २०१८ ते २०२० या काळात लक्ष्मी नारायण कौशिक आणि त्यांच्या साथीदारावर गुन्हेगारी कट रचल्याचा आरोप करण्यात आला. त्यांनी स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी वाढवलेल्या किमतीत कमी दर्जाचा कापूस खरेदी करून मेसर्स वेलस्पन लिव्हिंग लिमिटेडच्या विश्वासार्हतेचा गुन्हेगारी भंग केला. ते खंडणी व साक्षीदारांना धमकावण्यातही गुंतल्याचे आढळून आले.
लक्ष्मी नारायण कौशिक यांना त्यांच्या मालकीच्या आणि नियंत्रित केलेल्या कंपन्या आणि संस्थांमध्ये काही बोगस संस्था आणि बनावट (शेल) कंपन्यांकडून अस्पष्ट क्रेडिट्स प्राप्त झाल्याचे ईडीच्या तपासात दिसून आले. पीओसीचे लेअरिंग आणि एकीकरण करण्याच्या उद्देशाने त्यांनी दोन बनावट कंपन्या तयार केल्या होत्या आणि त्यांनी निर्दोष असल्याचे सांगितले होते.
या प्रकरणी लक्ष्मी नारायण कौशिक यांना नागपुरातील विशेष पीएमएलए न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायमूर्तींनी पुढील चौकशीसाठी लक्ष्मी नारायण कौशिक यांना १४ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.