निशांत वानखडे
नागपूर : बुधवारी सकाळी दरम्यान नागपूरकरांनाभूकंप झाल्यासारखे जाेरदार हादरे बसले. विशेषत: उत्तर नागपूरच्या नागरिकांना हा भीतीदायक अनुभव आला. विशेष म्हणजे भुकंपाचे केंद्र शहरापासून ३०० किमी दूर तेलंगनाच्या मुलुगु येथे हाेते, पण त्या धक्क्याने नागपूरकरांनाही हलवून साेडले.
सकाळी ७.२७ वाजताच्या सुमारास शहरात सिव्हील लाईन्ससह जरीपटका, जाफरनगर, मानकापूर या भागात नागरिकांना हादरे बसले. कामठी शहरातही असेच धक्के जाणवले. या भागातील इमारतीत काहीतरी थरथरल्यासारखे झाल्याचे नागरिकांनी सांगितले. विशेष म्हणजे अनेक भागात लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेरातही जाेरदार हालचाल झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले हाेते. हे हादरे काही सेकंदापुरते असले तरी नागरिकांना धडकी भरण्यास पुरेसे हाेते. त्यामुळे लाेकांचे या हादऱ्याचे अनुभव साेशल मीडियावर वाऱ्यासारखे पसरले. शेजारच्या राज्यात भुकंप आल्याने शहरातील वेगवेगळ्या कोपऱ्यांतील नागरिकांना भूकंपाचे धक्के जाणवले आणि त्यांच्या परिसरातील वस्तू आणि संरचना हादरल्याचे दिसले. भूकंपाचे धक्के लक्षात आल्यानंतर जवळपासच्या ग्रामीण भागातील घाबरलेले ग्रामस्थ घराबाहेर पडले. भूकंपाच्या वृत्ताने सोशल मीडियावर खळबळ उडाली आणि त्यामुळे प्रचंड उत्सुकता निर्माण झाली.
राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या माहितीनुसार भुकंपाचे केंद्र येथून सुमारे ३०० किमी दूर तेलंगणातील मुलुगु येथे हाेते व येथे ५.३ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाची नाेंद करण्यात आली. एवढ्या तीव्रतेमुळे दूरवर हादरे बसल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र नागपूर हे सिस्मिक झोन-२ अंतर्गत सुरक्षित क्षेत्र म्हणून वर्गीकृत असल्याने शहरात भुकंपाचा कुठलाही धाेका नसल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले. जिल्हाधिकारी डाॅ. विपीन इटनकर यांनी नागरिकांना जिल्ह्यात काहीही माेठे घडले नसून घाबरण्याची गरज नाही, असा दिलासा देत आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचे सांगितले.
यावर्षी जानेवारीपासूनच भूकंपाच्या नाेंदी
विशेष म्हणजे यावर्षी जानेवारीपासूनच नागपूरकरांना भूकंपाचे साैम्य हादरे बसले. आतापर्यंत किमान १२ वेळा नागपूरच्या आसपास भुकंपाच्या नाेंदी झाल्या आहेत. मात्र भुकंपाची तीव्रता २.६ ते २.८ च्या रेंजमध्ये हाेती. ऑक्टाेबर महिन्यात १२० किमी दूर सिवनी येथे धक्के जाणवले, तर ३० सप्टेंबरला अमरावतीच्या मेळघाट भागात ४.२ तीव्रतेचा भुकंपाची नाेंद आहे. या भागात भुकंपाच्या घटना का वाढत आहेत, यावर भारतीय भूगर्भ सर्वेक्षण विभागातर्फे अभ्यास केला जात आहे.