नागपूर : महाराष्ट्रातील नागपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये बुधवारी सकाळी ७ वाजून २९ मिनिटांच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू हा शेजारच्या तेलंगणा राज्यातील मुलुगु आहे. येथे यापूर्वी देखील भूकंपाचे धक्के जाणवले मात्र आज सकाळी जाणवलेला भूकंप गेल्या 20 वर्षांत सर्वाधिक तीव्रतेचा असल्याचे सांगितल्या जात आहे. जखमी किंवा नुकसानीचे कोणतेही तात्काळ वृत्त समोर आलेले नाही.
नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार सकाळी ७.२७ वाजता मुलुगुमध्ये ५.३ तीव्रतेचा भूकंप नोंदवला गेला. भारतीय हवामान विभाग (IMD) सूत्रांनी आणि स्थानिक रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपुरात हलके भूकंपाचे धक्के जाणवले. नागपूरकरांना सकाळी ७:३० वाजताच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले असता नागरिक घराबाहेर पडले असल्याचे सांगण्यात येत आहे. बेसा आणि मनीषनगर भागात हे धक्के तुलनेत अधिक तीव्र असल्याचे नागरिक सांगत आहेत.
तेलंगणाच्या अगदी जवळ असलेल्या गडचिरोलीतही सौम्य धक्के जाणवले, असे जिल्हा माहिती कार्यालयाने सांगितले. चंद्रपूरमध्ये, शहराच्या काही भागात, बल्लारपूर आणि तेलंगणा सीमेजवळील इतर तालुक्यांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले, असे जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्याने सांगितले.
प्रशासनाने रहिवाशांना पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवल्यास मोकळ्या जागेत जाण्याचा सल्ला देत शांत पण सतर्क राहण्याचे आवाहन केले. IMD अधिकाऱ्यांनी सांगितले की भूकंपाच्या केंद्रापासून साधारणपणे 200 ते 300 किमी अंतरावर हलके धक्के जाणवतात.