झाडाच्या फांदीत अडकून बिबट्याचा मृत्यू
By Admin | Updated: May 12, 2014 00:33 IST2014-05-12T00:33:49+5:302014-05-12T00:33:49+5:30
माकडाची शिकार करताना माकडांप्रमाणेच झाडावरून जमिनीवर तर जमिनीवरून झाडावर उड्या मारताना झाडाच्या दोन फांद्यांमध्ये अडकून बिबट्याचा अपघाती मृत्यू झाला.

झाडाच्या फांदीत अडकून बिबट्याचा मृत्यू
ंअचलपूर : माकडाची शिकार करताना माकडांप्रमाणेच झाडावरून जमिनीवर तर जमिनीवरून झाडावर उड्या मारताना झाडाच्या दोन फांद्यांमध्ये अडकून बिबट्याचा अपघाती मृत्यू झाला. गुगामल वन्यजीव विभागाच्या हरिसाल परिक्षेत्रातील जंगलात शुक्रवारी सकाळी ९.३० वाजता ही घटना उघडकीस आली. गुगामल वन्यजीव विभागाच्या हरिसाल परिक्षेत्रातील वनखंड क्रमांक ६३७-शेरीकुंडी परिसरात हरिसाल येथील रहिवासी गणेश शनवारे हिरव्या मांडवासाठी झाडांच्या फांद्या आणायला गेले असता त्यांच्या ही बाब निदर्शनास आली. जांभुळच्या झाडावर दोन फांद्यांमध्ये बिबट मृतावस्थेत अडकलेला आढळला. ही माहिती शनवारे यांनी महिला वन कर्मचारी कोथलकर यांना दिली. त्याआधारे गुगामल वन्यजीव विभागाचे सहायक वनसंरक्षक के. डी. पेशने, वनपाल गोंडचारे, वन कर्मचारी देशमुख, मेटकर यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. हरिसालचे पशुवैद्यकीय अधिकारी जावरकर यांनी शवविच्छेदन केले. मृत बिबटाचे वय साडेतीन वर्षे होते. वन नियमानुसार मृत बिबट्याला जाळण्यात आले. (तालुका प्रतिनिधी) शिकार्याची झाली शिकार बिबट चतुरस्त्र प्राणी असून मोठ्या शिताफीने शिकारीला पंज्यात पकडण्याचे कौशल्य असते. त्यामुळेच उंच उडी घेत शिकार करण्याच्या नादात झाडाच्या फांद्यांमध्ये अडकून बिबटाचा मृत्यू झाल्याचा अंदाज वनसूत्रांनी वर्तविला आहे. माकडाची शिकार करताना माकडाप्रमाणे उड्या मारताना बिबटाला प्राण गमवावे लागले. सीबीआयच्या चमूने केली चौकशी शुक्रवारी सकाळी बिबटयाचा आकस्मिक मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आल्याने संपूर्ण वन आणि व्याघ्र प्रकल्पात खळबळ उडाली. घटांग आणि ढाकणा येथील चार वाघ आणि अस्वलाच्या शिकार प्रकरणाचा तपास करण्यासाठी सीबीआयची चमू मेळघाटात असताना ही घटना घडली. त्यामुळे प्रथम बिबट्याची शिकार तर नव्हे, याची चौकशी करण्यात आली. झाडाच्या फांद्यामध्ये अडकून बिबट्याचा अपघाती मृत्यू झाल्याचे स्पष्ट होताच व्याघ्र अधिकार्यांसह क्षेत्रीय कर्मचार्यांचा जीव भांड्यात पडला.