नागपुरात बंददरम्यान उपद्रव करणाऱ्यांवर गुन्हे दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 22:41 IST2018-04-03T22:41:37+5:302018-04-03T22:41:54+5:30
‘भारत बंद‘च्या दरम्यान वाहनांची तोडफोड, दुकानांवर दगडफेक, जाळपोळ, रास्ता रोको आणि उपद्रव करून सामाजिक शांतता भंग करू पाहणाऱ्या ६५० पेक्षा जास्त आंदोलकांवर पोलिसांनी विविध कलमानुसार गुन्हे दाखल केले. शहरातील जरीपटका, सीताबर्डी, पाचपावली, सदर आणि नवीन कामठी पोलीस ठाण्यात हे गुन्हे दाखल झाले आहेत.

नागपुरात बंददरम्यान उपद्रव करणाऱ्यांवर गुन्हे दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘भारत बंद‘च्या दरम्यान वाहनांची तोडफोड, दुकानांवर दगडफेक, जाळपोळ, रास्ता रोको आणि उपद्रव करून सामाजिक शांतता भंग करू पाहणाऱ्या ६५० पेक्षा जास्त आंदोलकांवर पोलिसांनी विविध कलमानुसार गुन्हे दाखल केले. शहरातील जरीपटका, सीताबर्डी, पाचपावली, सदर आणि नवीन कामठी पोलीस ठाण्यात हे गुन्हे दाखल झाले आहेत.
भारत बंद शांततेत सुरू असताना जरीपटक्यातून तरुणांचा घोळका निघाला. सोमवारी दुपारी २.३० च्या सुमारास कडबी चौकात एसटी बस क्रमांक एमएच ४०/ एक्यू ४३८७ वर या घोळक्यातील काही आरोपींनी दगडफेक केली. त्यामुळे बसच्या काचा फुटून २० हजारांचे नुकसान झाले. बसचालक प्रशांत सनेश्वर यांच्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसानी सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल केला. दुसरा असाच एक गुन्हा जरीपटक्यातच दाखल झाला. सकाळी ११ च्या सुमारास इंदोरा चौकात जमावाने रस्ता अडवून दगडफेक केली. त्यामुळे या भागात काही काळ तणाव होता. पोलिसांनी परिस्थिती शिताफीने हाताळली. त्यानंतर रात्री २१ आरोपींविरुद्ध गैरकायद्याची मंडळी जमवून दंगा केल्याप्रकरणी गुन्ह दाखल केला. कृष्णा खोब्रागडे (समतानगर), आशिष सोमकुंवर (बाराखोली), अखिलेश ऊर्फ डोमा पाटील (इंदोरा), जितेंद्र घोडेस्वार, परेश जामगडे (नवीन नकाशा), शुभम ऊर्फ संदीप, भोला शेंडे, नाना सवाईथुल, मयूर पाटील, सतीश पाटील (भीम चौक), सुरेश कांबळे, अमित सूर्यवंशी, महेंद्र भांगे, गौरव अंबादे, बबलू तिरपुडे, अक्षय गजभिये, राकेश टेंभुर्णे, ऋषभ मेश्राम, पीयूष काळबांधे, संदीप टेंभुर्णे, अक्षय मेश्राम यांचा आरोपींच्या नावात समावेश आहे. सदर, पाचपावली आणि नवीन कामठी पोलीस ठाण्यातही आंदोलकांवर अशाच प्रकारे गुन्हे दाखल करण्यात आले.
सीताबर्डीत बसपा पदाधिकाऱ्यांवर गुन्हे
सोमवारी दुपारी २.३० वाजता संविधान चौकात धरणे आंदोलनादरम्यान बसपाच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह रस्त्यावर बसून वाहतूक रोखली. त्यामुळे या मार्गावरील वाहतुकीला अडसर निर्माण झाला आणि अनेकांची नाहक कुचंबणा झाली. परिणामी सीताबर्डी पोलिसांनी कृष्णा बेले, अनिल गोंडान, नागोराव जयकर, योगेश लांजेवार, महेश सहारे , आनंद सोमकुंवर, गौतम पाटील, रुपेश बागेश्वर, नितीन घोड़ेस्वार, माया शेंडे, नितीन फुलमाळी, चंदू बागडे , जयंत शेंडे, अनिल वाघधरे, प्रफुल्ल बाराहाते, उषा मेश्राम, संदीप शेंडे, उद्धव खड़से आणि त्यांच्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला. उपरोक्त आंदोलकांवर आक्षेपार्ह भाषेचा वापर करून सरकारविरोधी नारेबाजी करण्याचाही आरोप पोलिसांनी लावला आहे.
सदरमध्ये वाहनांची तोडफोड
सदर परिसरात आरोपी भोला शेंडे आणि त्याच्या साथीदारांनी दुपारी ३ च्या सुमारास रॅली काढली. रस्त्यावर उभी असलेल्या दुचाकी आणि चार चाकी वाहनांची तोडफोड करून आरोपींनी दहशत निर्माण केली. या प्रकरणी सदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सुरू आहे.