लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सण-उत्सवाच्या पावन पर्वात भाविक प्रवाशांची वाढलेली गर्दी लक्षात घेऊन दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्यानागपूर विभागाने पूजा स्पेशल ट्रेनच्या श्रृंखलेत आणखी एका नव्या गाडीचा समावेश केला आहे. ट्रेन क्रमांक ०८८६९ आणि ०८८७० या त्या दोन गाड्या होय.
नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी नागपूर ते जयनगरदरम्यान या ट्रेन चालणार आहेत. त्यापैकी ०८८६९ क्रमांकाची ट्रेन इतवारी स्थानकावरून १६, २३, आणि ३० ऑक्टोबरला तसेच ६ नोव्हेंबरला धावणार आहे. नागपूरच्या इतवारी स्थानकावरून ही गाडी ११ वाजता प्रस्थान करेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री १०.३० वाजता जयनगर स्थानकावर पोहोचेल. नागपूर विभागातील गोंदिया, डोंगरगड आणि राजनांदगाव स्थानकावर ही गाडी थांबणार आहे.
त्याचप्रमाणे ट्रेन नंबर ०८८७० जयनगर स्थानकावरून १८ आणि २५ ऑक्टोबर तसेच १ आणि ६ नोव्हेंबरला मध्यरात्री १२.३० वाजता प्रस्थान करेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी २ वाजता इतवारी नागपूर स्थानकावर पोहोचेल. ही गाडीदेखील गोंदिया, डोंगरगड आणि राजनांदगाव स्थानकावर थांबणार आहे. या गाड्यांना दोन एसएलआर, पाच जनरल, थर्ड एसी दोन, सेकंड एसी एक तसेच दहा स्लीपर कोच असे एकूण २० कोच राहणार आहेत. सणासुदीच्या दिवसात भाविकांना या गाड्यांचा विशेष उपयोग होणार आहे.