नागपुरात तपासणी शुल्कपोटी कॅन्सर रुग्ण रडकुंडीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 20:52 IST2018-04-03T20:52:11+5:302018-04-03T20:52:34+5:30
कॅन्सरच्या काळजीने काळवंडलेले चेहरे, असह्य वेदनांची झळ, खचत चाललेल्या देहात नाउमेद झालेले मन, त्यात खिशात जेमतेम पैसे, कालपर्यंत या रुग्णांना शासकीय रुग्णालयात सर्व तपासण्या नि:शुल्क व्हायच्या तिथे आज शुल्क लागत असल्याने अनेक कॅन्सर रुग्ण अडचणीत आले आहेत. नागपूर मेडिकलने कॅन्सरच्या सर्व रुग्णांना शुल्क माफ करण्याचा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण विभागाकडे पाठविला, परंतु दोन महिन्यांवर कालावधी होत असताना याला मंजुरी मिळाली नसल्याने गरीब रुग्ण रडकुंडीला आले आहे.

नागपुरात तपासणी शुल्कपोटी कॅन्सर रुग्ण रडकुंडीला
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कॅन्सरच्या काळजीने काळवंडलेले चेहरे, असह्य वेदनांची झळ, खचत चाललेल्या देहात नाउमेद झालेले मन, त्यात खिशात जेमतेम पैसे, कालपर्यंत या रुग्णांना शासकीय रुग्णालयात सर्व तपासण्या नि:शुल्क व्हायच्या तिथे आज शुल्क लागत असल्याने अनेक कॅन्सर रुग्ण अडचणीत आले आहेत. नागपूर मेडिकलने कॅन्सरच्या सर्व रुग्णांना शुल्क माफ करण्याचा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण विभागाकडे पाठविला, परंतु दोन महिन्यांवर कालावधी होत असताना याला मंजुरी मिळाली नसल्याने गरीब रुग्ण रडकुंडीला आले आहे.
राज्यातील शासकीय रु ग्णालयांमध्ये येणारा ८० टक्के रुग्ण हा गरीब असतो. म्हणूनच की काय, या रुग्णालयांमध्ये आरोग्य सुविधा पुरेशा नाहीत. वैद्यकीय क्षेत्रात झालेली नवनवीन संशोधने आणि बदललेल्या तंत्रज्ञानाचा फायदा येथील रुग्णांना लवकर मिळत नाही. अशा स्थितीत शासनाने सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांच्या (मेडिकल) विविध शुल्कात जानेवारी २०१८ पासून २५ टक्क्यांनी वाढ केली. नोंदणी शुल्क १० रुपयांवरून २० रुपये केले. विविध चाचण्यासह, उपचार, शस्त्रक्रिया, वॉर्ड, अतिदक्षता विभागाच्या शुल्कात भरमसाठ वाढ केली. पूर्वी या सर्व शुल्कातून कॅन्सर रुग्णांना वगळण्यात आले होते. यामुळे कॅन्सरसारख्या रुग्णांना थोडातरी आधार व्हायचा. औषधोपचार घेत होते. परंतु जानेवारी महिन्यापासून रक्ताचा कर्करोग सोडल्यास इतर सर्व कॅन्सर रुग्णांना शुल्काचा भुर्दंड पडत असल्याने चित्रच पालटले. कॅन्सर रुग्णाना विविध रक्त, मल, मूत्राच्या तपासण्यासह एक्स-रे, सिटी स्कॅन काही प्रकरणात एमआरआयही करावा लागतो. तर ज्यांचे निदान झाले त्यांना किमोथेरपी, रेडिएशन, शस्त्रक्रिया कराव्या लागतात. परंतु जेमतेम पैसे घेऊन मेडिकलमध्ये चांगल्या उपचाराचा आशेने येणाऱ्या रुग्णांचा हिरमोड होत आहे. रुग्णालयात महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना असलीतरी ही योजना कॅन्सरचे निदान झाल्यावरच मदत करते, मात्र रुग्णांकडे याचे निदान करण्याइतपतही पैसे राहत नसल्याने ते उपचारापासून वंचित राहत असल्याचे धक्कादायक वास्तव आहे.
फेब्रुवारी महिन्यात पाठविला होता प्रस्ताव
कॅन्सर रुग्णांच्या वाढत्या तक्रारीला घेऊन नागपूर मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी सर्वच कॅन्सर रुग्णांना मेडिकलच्या विविध शुल्कातून वगळण्याचा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण विभागाला फेब्रुवारी महिन्यात पाठविला. परंतु दोन महिने होऊनही विभागाकडून अद्यापही उत्तर प्राप्त झालेले नाही.
सिटी स्कॅन माफ करून द्या!
बुटीबोरी येथून आपल्या ५८ वर्षीय पतीसोबत आलेली त्यांची पत्नी सुनीता कांबळे या मेडिकलच्या कॅन्सर विभागातील डॉक्टरांना नि:शुल्क सिटी स्कॅन करण्यासाठी हात जोडून विनंती करीत होत्या. त्यांना बोलते केल्यावर त्या म्हणाल्या, यांच्या छातीत कॅन्सरची गाठ आहे, असे डॉक्टर म्हणतात. त्याची तपासणी करण्यासाठी सिटी स्कॅन लिहून दिले. परंतु यासाठी ३५० रुपये भरा असे म्हणतात. रोजी पाडून आलो, हातात १५० रुपये आहे. त्यानंतर रक्ताची तपासणी करण्यासही सांगितले, एवढा पैसा नाही आहे जी, असे म्हणत त्या पुन्हा डॉक्टरांच्या मागे लागल्या. हे चित्र केवळ नागपूर मेडिकलचेच नाही तर राज्यभरातील मेडिकलचे आहे.
मेडिकलमधील कॅन्सर रुग्णांना शुल्क माफ करण्याचा प्रस्ताव माझ्यापर्यंत पोहचला नाही. परंतु अधिकाऱ्यांशी बोलून यावर नक्कीच विचार करून सकारात्मक निर्णय घेता येईल.
गिरीश महाजन
वैद्यकीय शिक्षण मंत्री