रविभवनातील कॅन्टीनमध्ये सिलिंडर लिकेजमुळे आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 00:10 IST2018-12-11T00:08:53+5:302018-12-11T00:10:59+5:30
रविभवनातील कॅन्टीनच्या स्वयंपाकखोलीत गॅस सिलिंडरचे पाईप लिकेज होऊन लागलेल्या आगीत पोळ्या बनवीत असलेल्या तीन महिला जखमी झाल्या. ही घटना सोमवारी सायंकाळी ६.३० वाजता घडली.

रविभवनातील कॅन्टीनमध्ये सिलिंडर लिकेजमुळे आग
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळी तिन्ही महिला स्वयंपाक खोलीत फरशीवर बसून गॅसवर पोळ्या शेकत होत्या. सिलिंडरच्या रेग्युलेटरमधून शेगडीला गॅस पुरवठा करणारा पाईप लिकेज असल्याने जळू लागला. लगेच आगीचा भडका उडाला. या आगीत प्रमिलाबाई काही टक्के जळाल्या तर विद्याबाईचा हात आणि विजयाचा पाय जळाला. आगीची सूचना मिळताच अग्निशमन दलाचे पथक गाडीसह घटनास्थळी पोहोचले. यानंतर कॅन्टीनच्या संचालकांनी जखमी महिलांना उपचारासाठी मेयो रुग्णालयात दाखल केले.
कॅन्टीनचे संचालक निरंजन राव यांच्यानुसार, प्रमिलाबाई १५ टक्के जळाल्या तर इतर दोन्ही महिलांना साधारण जखमी झाल्याने डॉक्टरांनी त्यांना प्राथमिक उपचारानंतर सुटी दिली. राव यांच्यानुसार एक मोठा अनर्थ टळला.
दरम्यान मानव अधिकार संघटनेचे मिलिंद पौनीपगार यांनी सांगितले की, घटनेच्या वेळी आम्ही रविभवनातच होतो. वरच्या माळ्यावर आमच्या संघटनेची मिटिंग सुरू होती. अपघात होताच मी व मिलिंद दहिवले, गजेंद्रसिंग, बलराम बारसे आदी तातडीने खाली आलो. वृद्ध महिला मोठ्या प्रमाणावर जळाली होती. जखमींना तातडीने रुग्णालयात नेण्याबाबत मागणी करीत होतो. तेव्हा कॅन्टीनच्या संचालकांनी वाद घातला. ते फारसे गंभीर दिसून येत नव्हते. मग आम्ही जखमींना आॅटोत टाकून रुग्णालयात पोहोचविले.