आयात धोरणातील बदलांमुळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:25 IST2020-12-04T04:25:42+5:302020-12-04T04:25:42+5:30
- भाव आणखी कमी होणार : तूर डाळ २० ते २५ रुपयांनी उतरली नागपूर : केंद्र सरकारने आयात धोरणात ...

आयात धोरणातील बदलांमुळे
- भाव आणखी कमी होणार : तूर डाळ २० ते २५ रुपयांनी उतरली
नागपूर : केंद्र सरकारने आयात धोरणात बदल केल्यानंतर लॉकडाऊननंतर पहिल्यांदाच देशात सर्व डाळींचे भाव २५ टक्क्यांनी कमी झाले आहेत. ही गरीब आणि सामान्यांसाठी आनंदाची बाब आहे.
दिवाळीपूर्वी ऑक्टोबर महिन्यात देशात डाळींच्या भावात तेजी येऊन तूर डाळ १३० रुपये किलो, चणा डाळ ८० ते ९० रुपये, मसूर डाळ ७५ ते ८०, मूग डाळ व उडीद डाळ दर्जानुसार ९० ते १२५ रुपये किलोवर पोहोचली होती. त्यानुसार पुढेही भाववाढीची शक्यता वर्तविली जात होती. पण आता भाव कमी झाल्याने ठोक बाजारात गुरुवारी तूर डाळ दर्जानुसार ८ हजार ते ९४०० रुपये क्विंटल, चणा डाळ ५८०० ते ६४००, मसूर डाळ ६२०० ते ६५००, मूग मोगर व उडीद मोगरचे भाव ६२०० ते ६५०० रुपयांपर्यंत खाली आले आहेत. ऑक्टोबरमध्ये गावराणी तुरीचे भाव ८३०० ते ८४०० रुपये होते, ते आता ६३०० ते ६४०० रुपये असून, २ हजार रुपयांची घट झाली आहे. तर आयातीत तुरीचे भाव ७७०० ते ७८०० रुपयांवरून ५८०० ते ५९०० रुपयांपर्यंत कमी झाले आहेत. अर्थात १९०० रुपयांची घसरण झाली आहे. चण्याचे भाव ५६०० ते ५७०० रुपयांवरून ४८०० ते ४९०० रुपयांपर्यंत अर्थात ७०० ते ८०० रुपयांची घट झाल्याचे होलसेल ग्रेन अॅण्ड सीड्स मर्चंट्स असोसिएशनचे सचिव प्रताप मोटवानी यांनी सांगितले.
केंद्र सरकारतर्फे आयातीत डाळींसाठी परवाने जारी न करणे हे दरवाढीचे मुख्य कारण आहे. शेतकऱ्यांना चांगला आणि हमीभावापेक्षा कमी भाव मिळू नये म्हणून सरकार डाळींच्या आयातीत टाळाटाळ करीत होती. पण त्याचा विपरीत परिणाम होऊन भाववाढ झाली आणि लोकांनी ओरड सुरू केल्यानंतर सरकार या विषयावर जागरूक झाली. पुढे स्थिती बिघडण्यापूर्वीच डाळींच्या आयातीसाठी परवाने जारी केले. चार लाख टन तूर डाळ आयातीतील ३१ डिसेंबरपर्यंत परवाने देण्याचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय नाफेडच्या माध्यमातून बाजारात तूर डाळ विक्रीचा दबाब टाकण्यात आला. मसूर डाळीवर आयात शुल्क कमी करण्यात आले. सरकारच्या या आयात धोरणाने सर्व डाळींचे दर २५ टक्के कमी झाले आहेत. याशिवाय यावर्षी हवामान डाळींसाठी अनुकूल राहिल्याने चांगले पीक येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
सरकारने आयात धोरणात बदल केल्याने शेतकरी नाराज आहेत. अनेक वर्षांनंतर यंदा ऑक्टोबरमध्ये हमीभावापेक्षा जास्त भाव मिळाल्याने शेतकरी खुश होते. पण आता भाव कमी झाल्याने शेतकरी निराश आहेत.
सध्या नवीन तुरीची आवक सुरू झाली असून, पुढील महिन्यात वाढणार आहे. त्यामुळे भाव आणखी कमी होतील. फेब्रुवारीमध्ये मसूर व चण्याचे नवीन पीक येईल. त्यामुळे भाव नियंत्रणात राहतील. डाळींचे भाव कमी झाल्याने गृहिणींचे महिन्याचे बजेट कमी होणार आहे.