समृद्धी महामार्गावर दुहेरी उत्पन्नाचा स्रोत; सौरऊर्जा निर्मिती करणारा देशातील पहिला 'एक्सप्रेसवे' !
By शुभांगी काळमेघ | Updated: September 24, 2025 16:43 IST2025-09-24T16:39:38+5:302025-09-24T16:43:20+5:30
Nagpur : टोलशुल्काव्यतिरिक्त सौरऊर्जेच्या विक्रीतून होणारा उत्पन्नाचा फायदा MSRDC ला मिळेल.

Samruddhi Highway becomes the country's first 'expressway' to generate solar energy!
नागपूर : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग आता केवळ वेगवान प्रवासाचा मार्ग राहिला नाही, तर तो देशातील पहिला असा 'एक्सप्रेसवे' ठरला आहे जिथे सौरऊर्जा निर्मिती सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) हा पुढाकार घेऊन ऊर्जा निर्मितीच्या क्षेत्रात एक महत्त्वाचं पाऊल उचललं आहे.
विदर्भातील कारंजा लाड (वाशीम जिल्हा) आणि मेहकर (बुलढाणा जिल्हा) येथील इंटरचेंजवर सौर प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले आहेत. पहिल्या टप्प्यात कारंजा लाड येथे ३ मेगावॅट आणि मेखर येथे २ मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत.
हा प्रकल्प ‘महा समृद्धी नूतन ऊर्जा कंपनी’मार्फत उभारले गेले असून, या कंपनीचा MSRDC बरोबर २०२२ मध्ये करार झाला होता. या करारानुसार महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (MSEDCL) कडे वीज विक्री केली जाणार असून, याचा दर ३.०५ रुपये प्रति युनिट ठरवण्यात आला आहे.
ऊर्जा निर्मिती आणि महसूल यांचा दुहेरी लाभ
या सौर प्रकल्पांमुळे महामार्गासाठी एक नवा महसूल स्रोत निर्माण होणार आहे. टोलशुल्काव्यतिरिक्त सौरऊर्जेच्या विक्रीतून होणारा उत्पन्नाचा फायदा MSRDC ला मिळेल. यामुळे महामार्गाच्या देखभालीसाठी अतिरिक्त निधी उपलब्ध होईल.
तसेच, या प्रकल्पांमुळे हरित ऊर्जा निर्माण होणार असून, कार्बन उत्सर्जन कमी करण्यास मदत होणार आहे. भविष्यात इतर इंटरचेंजवरही असेच सौर प्रकल्प उभारण्याचा मानस MSRDC ने व्यक्त केला आहे.
समृद्धी महामार्गावर सुरू झालेली सौरऊर्जा निर्मिती ही केवळ तांत्रिक प्रगती नाही, तर पर्यावरणपूरक आणि शाश्वत विकासाकडे टाकलेलं एक मोठं पाऊल आहे. यामुळे महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांचा देशपातळीवर वेगळा आदर्श निर्माण झाला आहे.
सौरऊर्जेसारख्या स्वच्छ आणि नवीनीकरणीय ऊर्जेचा वापर करून महामार्ग व्यवस्थापनात स्वतःचा आर्थिक व पर्यावरणीय फायदा साधणं ही काळाची गरज आहे. समृद्धी महामार्गाने त्याची यशस्वी सुरुवात केली आहे.