नागपुरात दारुड्याने सावत्र आईला जाळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 23:40 IST2019-09-09T23:40:12+5:302019-09-09T23:40:46+5:30
एका दारुड्या युवकाने घरगुती वादातून सावत्र आईला पेट्रोल टाकून जाळले. ही घटना एमआयडीसीच्या महाजनवाडी येथे घडली.

नागपुरात दारुड्याने सावत्र आईला जाळले
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एका दारुड्या युवकाने घरगुती वादातून सावत्र आईला पेट्रोल टाकून जाळले. ही घटना एमआयडीसीच्या महाजनवाडी येथे घडली. गंभीररीत्या भाजलेल्या महिलेवर उपचार सुरू आहे. आरोपी प्रशांत ऊर्फ गोलू वसंत मडावी (३०) आहे. तर जखमी महिलेचे नाव सुनीता मडावी (५२) आहे. गोलू हा वाहनचालक असून, त्याचे वडील वसंत मडावी हे मजुरी करतात. गोलूचा जन्म झाला तेव्हा त्याच्या आईचा मृत्यू झाला होता. त्यानंतर वसंत मडावी यानी सुनीता हिच्याशी लग्न केले होते. गोलू नेहमीच सावत्र आईशी वाद घालत होता. त्याला दारूचे व्यसन होते. सुनीता त्याला नेहमीच दारू सोडण्याचा सल्ला देत होती.
गोलू नेहमीच आईवर संतापलेला असायचा. तो नेहमीसारखा रविवारी रात्री घरी आला. सोबत एका बॉटलमध्ये पेट्रोल घेऊन आला. त्याने सुनीताशी वाद घातला. तिच्या शरीरावर पेट्रोल टाकून आग लावली. यात ती गंभीर जखमी झाली आहे. शेजारच्यांनी तिला रुग्णालयात नेले. सुनीताची अवस्था गंभीर आहे. एमआयडीसी पोलीसांनी वसंत मडावी यांच्या तक्रारीवर हत्येचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करून गोलूला अटक केली आहे.