Nagpur | बेलतरोडीत २५ लाखांची ड्रग्ज पावडर जप्त, तडीपारासह तीन आरोपी अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2022 18:24 IST2022-07-11T18:21:10+5:302022-07-11T18:24:40+5:30
या तिघांकडूनही २५ लाखांच्या ड्रग्जसह मोबाईल, रोख रक्कम, कार असा एकूण २६ लाख ६५ हजारांचा माल जप्त करण्यात आला.

Nagpur | बेलतरोडीत २५ लाखांची ड्रग्ज पावडर जप्त, तडीपारासह तीन आरोपी अटकेत
नागपूर : शहरात एमडी पावडर या ड्रग्जची विक्री करण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीला नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेने गजाआड केले आहे. या टोळीकडून तब्बल २५ लाखांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. मागील काही कालावधीतील ही मोठी कारवाई मानण्यात येत आहे. एका तडीपार आरोपीसह तिघांना अटक झाली आहे.
नागपुरात मोठ्या प्रमाणात एमडी पावडरची तस्करी होणार असल्याची माहिती गुन्हे शाखेला खबऱ्यांच्या नेटवर्कमधून मिळाली होती. बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आरोपी येणार असल्याची टीप मिळाली व त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचला. शनिवारी सायंकाळी साडेपाचनंतर एक पथक खापरी परसोडी येथील महेश रेस्टॉरंटसमोर तैनात करण्यात आले. आरोपी तेथे आले असता त्यांच्या कारची व त्यांची झडती घेण्यात आली. त्यांच्याकडे २५० ग्रॅम वजनाची एमडी पावडर आढळली. पोलिसांनी इब्राहीम खान अकबर खान (वय ५३, हसनबाग), फारूख शेख मेहमूद (४२, मोठा ताजबाग, सक्करदरा), वाहीद खान रिझवान खान (३५, मोठा ताजबाग, सक्करदरा) या तिघांना अटक केली. यातील इब्राहीम खान अकबर खानवर अगोदरच तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. मात्र, तरीदेखील तो शहरात फिरत होता. या तिघांकडूनही २५ लाखांच्या ड्रग्जसह मोबाईल, रोख रक्कम, कार असा एकूण २६ लाख ६५ हजारांचा माल जप्त करण्यात आला. तिघांविरोधातही एनडीपीएस ॲक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ड्रग्जची बदलापूर ‘लिंक’
इतक्या मोठ्या प्रमाणात एमडी पावडर आरोपींकडे कशी आली यासंदर्भात गुन्हे शाखेने चौकशी केली. बदलापूर येथील आदिल शेख नावाच्या व्यक्तीने ही पावडर आरोपींना विकल्याची बाब यातून समोर आली. पोलीस आदिल शेखचादेखील शोध घेत आहेत.