चालकांचा निष्काळजीपणा, तीन ट्रक एक दुसऱ्यांना धडकले; वाहतुकीचा खोळंबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2022 18:17 IST2022-04-11T18:14:36+5:302022-04-11T18:17:39+5:30
नागपूर वर्धा महामार्गावर डोंगरगावजवळ सोमवारी पहाटे ५ च्या सुमारास हा अपघात घडला.

चालकांचा निष्काळजीपणा, तीन ट्रक एक दुसऱ्यांना धडकले; वाहतुकीचा खोळंबा
नागपूर : बेदरकारपणे ट्रक चालविणाऱ्या तीन चालकांनी एकमेकांना धडक दिल्याने तिन्ही चालक जखमी झाले असून त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नागपूर वर्धा महामार्गावर डोंगरगावजवळ सोमवारी पहाटे ५ च्या सुमारास हा अपघात घडला.
प्राथमिक माहितीनुसार, एकामागोमाग भरधाव निघालेले हे ट्रक डोंगरगावजवळ येताच समोरच्या वाहनचालकाचे नियंत्रण सुटले. त्याने करकचून ब्रेक दाबण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्याच्या ट्रकवर मागचा आणि दुसऱ्या ट्रकवर तिसरा ट्रक आदळला. परिणामी तीनही ट्रकची मोडतोड झाली तर चालक आणि वाहक जबर जखमी झाले. त्यांची नावे वृत्त लिहिस्तोवर स्पष्ट होऊ शकली नाही.
माहिती मिळताच बुटीबोरी आणि हिंगणा पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहचला. तोपर्यंत या मार्गावरची वाहतूक खोळंबली होती. लांबच लांब रांगा वाहनांच्या लागल्याने अनेक प्रवाशांची, वाहनचालकाची नाहक कुचंबणा झाली. पोलिसांनी क्रेन बोलवून ट्रक बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.