नागपुरात वेकोलिच्या निवृत्त व्यवस्थापकांकडे धाडसी घरफोडी : ८६० ग्राम सोने लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 22:41 IST2019-02-22T22:39:03+5:302019-02-22T22:41:46+5:30
वेकोलिच्या निवृत्त व्यवस्थापकांच्या शिवाजीनगरातील सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी ८६० ग्राम सोन्यांच्या दागिन्यांसह १३ लाख, ६१ हजारांचा ऐवज चोरून नेला. गुरुवारी दुपारी उजेडात आलेल्या या धाडसी घरफोडीमुळे अंबाझरी शिवाजीनगर परिसरात प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे.

नागपुरात वेकोलिच्या निवृत्त व्यवस्थापकांकडे धाडसी घरफोडी : ८६० ग्राम सोने लंपास
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वेकोलिच्या निवृत्त व्यवस्थापकांच्या शिवाजीनगरातील सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी ८६० ग्राम सोन्यांच्या दागिन्यांसह १३ लाख, ६१ हजारांचा ऐवज चोरून नेला. गुरुवारी दुपारी उजेडात आलेल्या या धाडसी घरफोडीमुळे अंबाझरी शिवाजीनगर परिसरात प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे.
रामलखनप्रसाद नागेश्वर प्रसाद गुप्ता (वय ६३) हे वेकोलिचे निवृत्त व्यवस्थापक होय. ते शिवाजीनगरातील मनुशांती अपार्टमेंटच्या सहाव्या माळ्यावर ६१६ क्रमांकाच्या सदनिकेत राहतात. कुटुंबातील लग्न सोहळ्याच्या निमित्ताने २५ जानेवारीला गुप्ता सहपरिवार रांची (बिहार) येथे गेले. गुरुवारी दुपारी परत आले तेव्हा त्यांना दाराचे कुलूप तुटून दिसले. सदनिकेतील शयनकक्षातील सर्व साहित्य अस्तव्यस्त करून चोरट्यांनी कपाटातील २० सोन्याच्या नाण्यांसह (गोल्ड कॉईन) ८६० ग्राम सोन्याचे दागिने, ७ महागडी हातघड्याळं, लॅपटॉप तसेच ५ हजार रुपये असा एकूण १३ लाख, ६१ हजारांचा ऐवज चोरून नेला. गुप्ता यांनी अंबाझरी पोलिसांना माहिती दिली. श्वानपथक आणि ठसे तज्ज्ञांच्या पथकांसह पोलिसांचा ताफा तेथे पोहचला. दरम्यान, या धाडसी घरफोडीचे वृत्त कळताच परिसरात प्रचंड खळबळ निर्माण झाली. चोरट्यांचा माग काढण्यासाठी पोलिसांनी सीसीटीव्हीचे फुटेज ताब्यात घेतले. त्यात काही चोरट्यांचे चेहरे स्पष्ट दिसत असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे लवकरच चोरट्यांचा छडा लागण्याचा विश्वास पोलीस व्यक्त करीत आहेत. दरम्यान, गुप्ता यांच्या तक्रारीवरून अंबाझरीचे सहायक पोलीस निरीक्षक फुलकवर यांनी गुन्हा दाखल केला. चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.
विदेशी मुलीचे दागिनेही लंपास
गुप्ता यांनी आपल्या नोकरीच्या कार्यकाळात पगाराच्या पैशातून मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करून ठेवले होते. चोरट्यांनी ते एकाच झटक्यात लंपास केले. गुप्ता यांची एक मुलगी विदेशात नोकरी करते. चोरट्यांनी लंपास केलेल्या दागिन्यात तिचेही दागिने मोठ्या प्रमाणात असल्याचे पोलीस सांगतात.