नागपुरात डीसीपींच्या सहीचा बनावट परवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 23:43 IST2018-04-10T23:43:13+5:302018-04-10T23:43:28+5:30
वाहतुकीला प्रतिबंध असताना दोन आरोपींनी वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्तांच्या बनावट हस्ताक्षराचा परवाना तयार करून त्याआधारे टिप्परची वाहतूक करण्याचा प्रयत्न केला. ही बनवाबनवी उघड झाल्यानंतर कळमना पोलीस ठाण्यात आरोपी संतोष जयराम जिपके (वय ४३, रा. नागार्जुन कॉलनी नारी) आणि दीपक श्रीकांत गणवीर (वय ३२) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.

नागपुरात डीसीपींच्या सहीचा बनावट परवाना
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वाहतुकीला प्रतिबंध असताना दोन आरोपींनी वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्तांच्या बनावट हस्ताक्षराचा परवाना तयार करून त्याआधारे टिप्परची वाहतूक करण्याचा प्रयत्न केला. ही बनवाबनवी उघड झाल्यानंतर कळमना पोलीस ठाण्यात आरोपी संतोष जयराम जिपके (वय ४३, रा. नागार्जुन कॉलनी नारी) आणि दीपक श्रीकांत गणवीर (वय ३२) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.
वाहतूक शाखेच्या इंदोरा चेंबर-५चे पीएसआय अनंत उईके सोमवारी ९ एप्रिलला सकाळी ९ वाजता कापसी पुलाजवळ कर्तव्य बजावत होते. संतोष हा टिप्पर क्रमांक एमएच ४०/ एके ००२५ घेऊन नागपुरात येताना दिसल्याने उईकेने त्याला थांबवले. सकाळी ९ ते रात्री ९ या कालावधीत जड वाहनांना प्रवेश बंद असल्याचे त्यांनी सांगितले असता आरोपी संतोषने पीएसआय उईके यांना टिप्पर क्रमांक एमएच ४०/एके ००२५ चा परवाना दाखवला. त्यात २० मार्च ते १८ एप्रिलपर्यंतची मुभा होती आणि त्याखाली वाहतूक शाखेचे उपायुक्त म्हणून रवींद्र परदेशी यांची स्वाक्षरी होती.
हा परवाना बोगस असल्याचे लक्षात आल्यानंतर दुसरा टिप्पर क्रमांक एमएच ३६/०९०७ चा चालक दीपक गणवीर याच्याकडेही असाच बनावट परवाना असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे कळमना ठाण्यात गुन्हा दाखल करून या दोघांना अटक करण्यात आली.