धवनकरांच्या मार्गदर्शनातील पीएचडीबाबतही संशयाची सुई; संशाेधनासाठी पैसे मागितल्याची चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2022 13:59 IST2022-11-16T13:56:21+5:302022-11-16T13:59:22+5:30
विद्यापीठात नवनवीन खुलासे

धवनकरांच्या मार्गदर्शनातील पीएचडीबाबतही संशयाची सुई; संशाेधनासाठी पैसे मागितल्याची चर्चा
नागपूर : राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज नागपूर विद्यापीठातीलखंडणी वसुली प्रकरणात धर्मेश धवनकरांशी संबधित नवनवीन खुलासे समाेर येत आहेत. धवनकरांच्या मार्गदर्शनात पीएच.डी करणाऱ्यांकडून पदवी मिळण्यासाठी पैसा मागितल्याच्या तक्रारी समाेर येत आहेत. शिवाय त्यांच्या मार्गदर्शनात झालेल्या पीएच.डीबाबतही संशय व्यक्त केला जात असून, परराज्यातील ते सहा पीएच.डीधारक काेण, अशी चर्चा विद्यापीठ वर्तुळात सुरू आहे.
जनसंवाद विभागाचे सहायक प्राध्यापक धर्मेश धवनकर यांनी लैंगिक छळाच्या तक्रारी आल्याचा बनाव करून खंडणी वसुली केल्याच्या सात विभागप्रमुखांच्या आराेपाने विद्यापीठाचे वातावरण ढवळून निघाले आहे. विद्यापीठ प्रशासनाने पहिली कारवाई करून त्यांच्याकडून विद्यापीठाचे पीआरओ पद काढून घेतले आहे. शिवाय कुलगुरू डाॅ. सुभाष चाैधरी यांनी परिपत्रक काढून विभागप्रमुख, शिक्षक, अधिकारी, कर्मचाऱ्यांना कुणाची धमकी येत असेल तर थेट तक्रारी करण्याचे आवाहन परिपत्रकाद्वारे केले आहे. दरम्यान, मंगळवारी धवनकरांच्या मार्गदर्शनात पीएच.डी करण्याबाबतही संशय व्यक्त केला जात आहे.
यापूर्वी अनेकदा धवनकर यांच्या पीएच.डीवरही संशय घेतला गेला हाेता. आता त्यांच्या मार्गदर्शनात पीएच.डी करणाऱ्यांबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे. सूत्राच्या माहितीनुसार धवनकरांच्या मार्गदर्शनात बाहेरील राज्यातील सहा विद्यार्थ्यांनी पीएच.डी केली आहे. काही वर्षापूर्वी उमेदवाराने या प्रकरणात तत्कालीन कुलगुरुंकडे माैखिक तक्रार केली हाेती. याशिवाय सामान्य पीएच.डीधारकांकडूनही पैसा मागितला जात असल्याची चर्चा केली जात आहे.
रायुकाॅंची पाेलीस आयुक्ताकडे तक्रार
दरम्यान, राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसने साेमवारी विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. चाैधरी यांच्याकडे निवेदन दिल्यानंतर मंगळवारी शहर पाेलीस आयुक्त अमितेश कुमार यांना या प्रकरणाची चाैकशी करण्याचे निवेदन दिले. खंडणीवसुली प्रकरणात पाेलीस आयुक्तांकडून चाैकशी करण्यात यावी, अशी मागणी रायुकाॅंचे शहर अध्यक्ष शैलेंद्र तिवारी यांनी केली आहे.