'सत्ता आली म्हणून माज येऊ देऊ नका, खुर्चीवर बसलेला एक दिवस उठणारच' गडकरींनी टोचले कार्यकर्त्यांचे कान
By योगेश पांडे | Updated: April 6, 2026 19:55 IST2026-04-06T19:54:44+5:302026-04-06T19:55:43+5:30
Nagpur : राजकारणात पिढी बदलते व त्यासोबतच नेतृत्वातदेखील बदल होतो. मात्र नेतृत्वाच्या पोटातून नवीन नेतृत्व समोर यायला नको. कार्यकर्त्यांतून नेतृत्व घडायला हवे.

'Don't let the people get angry just because they came to power, those sitting on the chair will lose it one day' Gadkari told the workers
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राजकारणात पिढी बदलते व त्यासोबतच नेतृत्वातदेखील बदल होतो. मात्र नेतृत्वाच्या पोटातून नवीन नेतृत्व समोर यायला नको. कार्यकर्त्यांतून नेतृत्व घडायला हवे. विशेष म्हणजे सत्ता मिळाली किंवा खुर्ची आली म्हणून माज येऊ देऊ नका. कारण जो खुर्चीवर बसला आहे तो उठणारच आहे. जर नाही उठला तर देव त्याला घेऊन जाईलच, या शब्दांत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी कार्यकर्त्यांचे कान टोचले. नागपुरात भाजपच्या ४६व्या स्थापना दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते.
हालातील टिळक पुतळ्याजवळ झालेल्या या कार्यक्रमाला भाजपचे शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी, महापौर नीता ठाकरे प्रामुख्याने उपस्थित होते. भारतीय जनता पक्षाची आजवरची प्रगती ही कार्यकर्त्यांच्या कष्टाचे फळ असून, कार्यकर्ता हाच पक्षाचा खरा कणा आहे. आपल्याकडे काही लोकांना दिवसरात्र केवळ निवडणूकाच दिसतात. माझे काय होईल हाच ते विचार करत असतात. मला एक संधी हवी असे ते म्हणतात. मात्र आम्ही यांना संधी द्यायला आलेलो नाही, समाज बदलायला आलो आहे हे कार्यकर्त्यांनी कायम लक्षात ठेवावे, असे गडकरी म्हणाले. पक्षाची स्थापना कुणाला पंतप्रधान करण्यासाठी झाली नव्हती. विरोधकांनी आमच्या पक्षाविरोधात गरळ ओकण्याचेच काम केले. मात्र तरीदेखील विशिष्ट समुदायाविरोधात भाजप असल्याचा अपप्रचार करण्यात आला. भाजपकडून सर्वच पुजापद्धतींचा सन्मान करण्यात येतो, असेदेखील गडकरी म्हणाले. दयाशंकर तिवारी यांनी जनसंघापासूनच्या प्रवासावर प्रास्ताविकातून प्रकाश टाकला. कार्यक्रमाला आ. प्रवीण दटके, आ. कृष्णा खोपडे, संघटनमंत्री उपेंद्र कोठेकर, माजी आमदार सुधाकर कोहळे, विकास कुंभारे, उपमहापौर लीला हाथीबेड, प्रदेश उपाध्यक्ष संजय भेंडे, अर्चना डेहनकर, जयप्रकाश गुप्ता, श्रीकांत देशपांडे, राजेश बागडे, श्रीकांत आगलावे, विष्णू चांगदे इत्यादी पदाधिकारी, नगरसेवक प्रामुख्याने उपस्थित होते. रितेश गावंडे यांनी संचालन केले, तर आगलावे यांनी आभार मानले.
संस्कृतमधून झाला इराणच्या पर्शियन भाषेचा उगम
इराणमध्ये चाबार बंदर तयार होत आहे. मी त्या खात्याचा मंत्री असताना तेथे जाण्याची संधी मिळाली गोती. र्शियन भाषेचा उगम संस्कृतमधून झाला आहे व तेहरान विद्यापीठात संस्कृत अध्यासन आहे, असे तत्कालिन राष्ट्राध्यक्ष अय्यातुल्ला खोमेनी यांनी मला सांगितले होते.
सरकार व राजा सेक्युलर असावा, पण व्यक्ती धर्मनिरपेक्ष नसतो
माजी मुख्यमंत्री ए.आर.अंतुले यांनी मला सांगितले होते की मी कोकणस्थ ब्राह्मण आहे व माझे मूळ अडनाव करंदीकर होते. हिंदू धर्मात काही वाईट प्रथा होत्या. सातसमुद्रापार गेले तर हिंदू धर्मातून काढा असे म्हणायचे. काही ब्राह्मण पंडितांनी चुकीच्या रुढींतून हिंदू धर्माचे खूप नुकसान केले. मात्र बहुसंख्य हिंदू समाजाच्या सर्वसमावेशकतेमुळे देशात विविधता कायम आहे. हिंदू ही जात, धर्म, पंथ नसून ही जीवनपद्धती आहे. सरकार व राजा सेक्युलर असायला हवी, मात्र व्यक्ती धर्मनिरपेक्ष नसतो. जर इंदिरा गांधी व राजीव गांधी सेक्युलर होते, पण त्यांच्या अंत्यसंस्काराला ब्राह्मणांना बोलविण्यात आले होते. ते सेक्युलर पक्षाचे असले तरी त्यांच्यासोबत धर्म जुळला होता असे गडकरी म्हणाले.