लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : 'अॅक्युट एन्सेफलायटिस सिंड्रोम' (एईएस) या मेंदूज्वराच्या आजाराचा शहरात शिरकाव झाला आहे. या आजाराच्या आठ रुग्णांची नोंद झाली असून, यातील पाच रुग्ण हे मध्यप्रदेशातील, दोन रुग्ण नागपूर शहर व एक नागपूर ग्रामीणमधील आहेत. मेंदूशी संबंधित या आजारावर वेळीच उपचार न केल्यास मृत्यूचा धोका निर्माण होऊ शकत असल्याने महापालिकेची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.
शहरात या रुग्णांची नोंद होताच सुरक्षेच्या दृष्टीने महापालिकेचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांच्या निर्देशानुसार वैद्यकीय आरोग्याधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांच्या नेतृत्वात शहरात आवश्यक उपाययोजना करण्यावर भर देण्यात येत आहे. शहरातील सर्व शासकीय व खासगी रुग्णालयांना त्यांच्याकडे येणाऱ्या रुग्णांना 'अॅक्युट एन्सेफलाइटिस सिंड्रोम'शी संबधित लक्षणे आढळल्यास तशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाला देण्याची सूचना दिल्या आहेत.
काय आहे 'एईएस'
'अॅक्युट एन्सेफलाइटिस सिंड्रोम' (एईएस) म्हणजे मेंदूला होणारी तीव्र जळजळ किंवा सूज, या आजाराची लक्षणे अचानक तीव्र ताप येणे, मानसिक आरोग्यावर परिणाम गोंधळणे, चक्कर येणे, झटके येणे किंवा बेशुद्ध पडणे. काही वेळा व्यक्तीला बोलता येत नाही किंवा चालताना अडचण येऊ शकते.