यूपीचे द्वेषाचे राजकरण महाराष्ट्रात आणू नका; काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सल्ला
By कमलेश वानखेडे | Updated: March 25, 2025 17:06 IST2025-03-25T17:05:28+5:302025-03-25T17:06:48+5:30
Nagpur : महालातील शिवाजी पुतळा चौकासह दंगलग्रस्त भागात दिली भेट

Don't bring UP's politics of hatred to Maharashtra; Congress leader Hussain Dalwai's advice to Chief Minister Devendra Fadnavis
कमलेश वानखेडे, नागपूर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर दंगलीतील आरोपी युसूफ खान याच्या घरावर महापालिकेने बुलडोजर चालविला. यावर काँग्रेसच्या सत्यशोधन समितीचे सदस्य व माजी खासदार हुसेन दलवाई यांनी यूपीचे द्वेषाचे राजकरण महाराष्ट्रात आणू नका, असा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला. बांधकाम अनधिकृत असेल तर सर्वोच्च न्यायालयाच्या नियमात राहून कारवाई करावी. पण ती विशिष्ट सामाजासाठी राहू नये, असे सांगत मुंबइत अनेक अनधिकृत बिल्डिंग आहे तिथे बुलडोझर चालवणार आहे का, असा सवालही दलवाई यांनी केला.
हुसेन दलवाई यांनी मंगळवारी महाल, शिवाजी पुतळा चौक, भालदारपुरा यासह दंगलग्रस्त भागात भेट दिली. यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, युसूफ खान चे घर पाडले यात सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेले नियम पाळले नाही. बुलडोजर यूपीत ठीक आहे. पण हा शिवाजी महाराजाचा महाराष्ट्र आहे. शिवाजी महाराज यांनी मुस्लिम धर्मियांना जवळ केले. इथली परंपरा जातीयवादी नाही, तर एकोप्याची आहे. ज्या ठिकाणी अशा पद्धतीचे दंगे होतात त्या ठिकाणी मी जात असतो. भेट देऊन दोन्ही समाजात भाईचारा राहावा, शांतता राखावी यासाठी प्रयत्न करतो. नागपुरात आल्यावर सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींसह अनेक लोकांना, पत्रकारांना भेटलो. महाराष्ट्रात अशा पद्धतीचे वातावरण कधीही नव्हते. महाराष्ट्रात नेहमीच दोन्ही धर्माचे एकोप्याचे नाते राहिलेले आहे. अनेक सणांमध्ये हिंदू मुस्लिम एकत्र येतात. गुढीपाडवा, राम नवमी शांततेत होईल याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दंगलग्रस्त भागाच्या पाहणी दरम्यान दलवाई यांच्यासोबत काँग्रेस पदाधिकारी दिनेश बानाबाकोडे, नॅश अली, प्रकाश सोनवने, ॲड. अभय रणदिवे, हाफीज पटाण, फिरोज खान, मोईन अली आदी उपस्थित होते.
मुस्लिम धर्मियांनी गांधींच्या मार्गाने उत्तर द्यायला हवे होते
हिरवी चादर जाळण्यात आली त्यामुळे हा दंगा भडकला. अशा पद्धतीच्या आंदोलनात पोलीस हस्तक्षेप करतात, जाळायला कधीही परवानगी देत नाही. यात चादर जाळायला परवानगी कशी दिली. सकाळी ज्यांनी आंदोलन केले त्यांच्यावर कारवाई नाही. ज्यांनी रात्री आंदोलन केले त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले. सरकार जाणीवपूर्वक काही लोकांना मदत करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. मुस्लिम धर्मियांनी सुद्धा महात्मा गांधींच्या शांततेच्या मार्गाने त्याला उत्तर देऊ शकले असते, असेही दलवाई म्हणाले.