आणिबाणीच्या काळातील संघर्षाचे दस्तावेज उपलब्ध नाहीत; नितीन गडकरी यांनी व्यक्त केली खंत
By आनंद डेकाटे | Updated: November 23, 2025 22:26 IST2025-11-23T22:26:06+5:302025-11-23T22:26:06+5:30
लोकशाही वाचविण्यासाठी केलेल्या संघर्षाची जाणीव उपस्थितांना करून दिली.

आणिबाणीच्या काळातील संघर्षाचे दस्तावेज उपलब्ध नाहीत; नितीन गडकरी यांनी व्यक्त केली खंत
आनंद डेकाटे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : देशातील आणिबाणीचा काळ हा भारतीय लोकशाहीतील सर्वात संघर्षमय आणि निर्णायक टप्पा मानला जातो. मात्र या कालखंडाचे दस्तावेजीकरण अत्यल्प असल्याबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी खंत व्यक्त केली. "माझ्या दोन्ही मुलांना इमर्जन्सीबद्दल माहिती नाही; कारण त्या काळाविषयी आमच्याकडे कोणत्याही नोंदी उपलब्ध नाहीत," असे सांगताना त्यांनी त्या कालखंडातील आपल्या स्वानुभवांची उजळणी केली आणि लोकशाही वाचविण्यासाठी केलेल्या संघर्षाची जाणीव उपस्थितांना करून दिली.
रेशीमबाग मैदानावर आयोजित नागपूर पुस्तक महोत्सव-२०२५च्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला उच्च व तांत्रिक शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, एनबीटी इंडिया अध्यक्ष प्रा. मिलिंद मराठे, प्रसिद्ध लेखक अमिश त्रिपाठी, तसेच झिरो माईल यूथ फाउंडेशनचे अध्यक्ष अजय संचेती उपस्थित होते.
गडकरी पुढे म्हणाले, त्या काळात जे काही घडत होते, त्याची नोंद ठेवण्याची आपल्या समाजात परंपरा नव्हती. इंग्रज दररोज डायरी लिहायचे; मात्र आपल्याकडे ही सवय क्वचितच होती. त्यामुळे आणिबाणीवरील तपशीलवार नोंदी आज उपलब्ध नाहीत. या विषयावर पुस्तकेही पुरेशा प्रमाणात तयार होऊ शकली नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले, जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात आंदोलन झाले. आम्ही रस्त्यावर उतरलो, लाठीमार सहन केला. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. मात्र त्या काळातील त्यागाचे पुरावे आज कुठेच दिसत नाहीत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. गडकरी यांनी डायरी लिहण्याची सवय, इतिहासिक नोंदी आणि पुस्तक स्वरुपातील दस्ताऐवजीकरण यांचे महत्व सांगण्याचे प्रयत्न यावेळी प्रयत्न केला.