जबडा-कपाळ छेदून गोळी थेट बाहेर; मृत्यूच्या जबड्यातून पोलिसाला वाचवण्यात यश
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 08:00 IST2025-02-11T07:59:51+5:302025-02-11T08:00:33+5:30
नाकाच्या आतील भागातून गोळी गेल्याने श्वास घेणे कठीण झाले होते. प्रकृती चिंताजनक होती. डॉक्टरांनी त्वरित उपचार सुरू केले. श्वासोच्छ्वासासाठी गळ्यात तात्पुरता छिद्र करून श्वासनलिकेत ट्यूब टाकण्यात आली.

जबडा-कपाळ छेदून गोळी थेट बाहेर; मृत्यूच्या जबड्यातून पोलिसाला वाचवण्यात यश
नागपूर : ड्यूटीवर असताना एका पोलिस जवानाने आपल्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने स्वत:वर गोळी झाडली. गोळी खालच्या जबड्यातून कपाळाचे हाड छेदून बाहेर पडली. गंभीर जखमी अवस्थेत पोलिस जवानाला अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) दाखल केले. डॉक्टरांनी गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी करून व अचूक उपचार करून पोलिसाला मृत्यूच्या जबड्यातून बाहेर काढले. लवकरच त्यांना रुग्णालयातून सुटी दिली जाणार आहे.
१८ जानेवारीला सकाळी ही घटना घडली. जखमी पोलिसाला तातडीने नागपूर ‘एम्स’च्या ‘ट्रॉमा केअर सेंटर’मध्ये दाखल केले. खालच्या जबड्यातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव होत होता. नाकाच्या आतील भागातून गोळी गेल्याने श्वास घेणे कठीण झाले होते. प्रकृती चिंताजनक होती. डॉक्टरांनी त्वरित उपचार सुरू केले. श्वासोच्छ्वासासाठी गळ्यात तात्पुरता छिद्र करून श्वासनलिकेत ट्यूब टाकण्यात आली.
आतील हाडांचे नुकसान
खालच्या जबड्यातून गोळी आत शिरून वरचा जबडा, नंतर नाकाचे हाड, कपाळाचे हाड छेदून बाहेर पडल्याने चेहऱ्याच्या आतील हाडांचे मोठे नुकसान झाले होते. डॉक्टरांनी चेहऱ्यावर शस्त्रक्रिया करून हाडे पुन्हा व्यवस्थित बसविली आहे. त्यासाठी विशेष मेटल प्लेट आणि स्क्रूचा वापर केला गेला.
‘एम्स’च्या आपत्कालीन सेवेचे हे उत्तम उदाहरण ठरले. डॉक्टरांच्या पथकाने वेळेत अचूक निर्णय घेऊन उपचार केल्याने पोलिस जवानाचा जीव वाचला.
डॉ. प्रशांत जोशी, कार्यकारी संचालक एम्स, नागपूर