कळमना घोटाळ्याची माहिती आहे? नागरिकांनो एसआयटीशी निःसंकोच संपर्क करा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 19:55 IST2025-07-23T19:54:37+5:302025-07-23T19:55:08+5:30
Nagpur : सदस्य सचिव विभागीय सहनिबंधक जरे यांचे आवाहन

Do you have information about the Kalamana scam? Citizens, feel free to contact the SIT
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर येथील कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीत झालेला भ्रष्टाचार किंवा अनियमिततेबाबत बाजार समितीमधील किंवा बाहेरील कुठल्याही व्यक्तीजवळ काही माहिती असेल किंवा त्यांना काही माहिती द्यायची असेल तर त्यांना थेट 'एसआयटी' शी संपर्क साधता येणार आहे. तशी मुभा 'एसआयटी'ने दिली आहे. यामुळे येत्या काळात बाजार समितीशी संबंधित अनेक तक्रारी व पुरावे एसआयटीच्या हाती लागण्याची शक्यता आहे.
नागपूर येथील कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाने केलेल्या गैरव्यवहार, भ्रष्टाचाराबाबत चौकशी करण्यासाठी सहकार विभागाने १८ जुलै रोजी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपासणी पथकाची स्थापना (एसआयटी) केली आहे. एसआयटीने चौकशी प्रक्रिया सुरू केली आहे. या चौकशीच्या संबंधाने कुणाला काही माहिती द्यायची असेल तर संबंधितांनी जिल्हाधिकारी, नागपूर, जिल्हा पोलिस अधीक्षक, नागपूर ग्रामीण यांच्या कार्यालयात संपर्क साधावा व कागदपत्र सादर करावे.
असा आहे पत्ता, ई-मेलही करू शकता
विशेष तपासणी पथक यांचे कार्यालय भूविकास बँक कॉम्प्लेक्स, दुसरा माळा, गणेशपेठ पोलिस स्टेशनसमोर, नागपूर-१२ व apmcsit25@gmail.com या ई-मेल पत्त्यावर माहिती पाठवावी, असे आवाहन 'एसआयटी'चे सदस्य सचिव विभागीय सहनिबंधक शरद जरे यांनी केले आहे.