वीज यंत्रणेजवळ कचरा जाळू नका : महावितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 22:31 IST2019-03-27T22:30:34+5:302019-03-27T22:31:25+5:30
वीजवाहिन्या, वितरण रोहित्र, फीडर पिलर किंवा वितरण पेट्यांजवळ कचरा जाळण्याच्या प्रकारामुळे वीजयंत्रणेला धोका निर्माण होऊन सर्वसामान्य नागरिकांसोबतच वीज वितरण कंपनीलाही नाहक मन:स्ताप सहन करावा लागत असल्याने वीजयंत्रणेजवळ कचरा टाकू नये आणि त्यास जाळूही नये, असे आवाहन महावितरणने केले आहे.

वीज यंत्रणेजवळ कचरा जाळू नका : महावितरण
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वीजवाहिन्या, वितरण रोहित्र, फीडर पिलर किंवा वितरण पेट्यांजवळ कचरा जाळण्याच्या प्रकारामुळे वीजयंत्रणेला धोका निर्माण होऊन सर्वसामान्य नागरिकांसोबतच वीज वितरण कंपनीलाही नाहक मन:स्ताप सहन करावा लागत असल्याने वीजयंत्रणेजवळ कचरा टाकू नये आणि त्यास जाळूही नये, असे आवाहन महावितरणने केले आहे.
शहरी व ग्रामीण भागात अनेक ठिकाणी वीजवाहिन्या, फीडर पिलर, वितरण रोहित्र, वितरण पेटी किंवा डीपी अशा वीजयंत्रणेजवळील उघड्यावर असलेल्या जागेत कचरा टाकण्यात येतो. वीजयंत्रणेजवळ साठवलेला हा कचरा पेटविल्याने किंवा इतर कारणामुळे कचरा जळाल्याने विजेच्या भूमिगत केबल व इतर वीजयंत्रणा आगीमुळे नादुरुस्त झाल्याच्या घटना घडल्या आहेत. पर्यायाने संबंधित परिसरातील वीजपुरवठाही खंडित झालेला आहे. दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढत असल्याने कचऱ्यास आगी लागण्याचे प्रकारही वाढत आहेत.
वीजयंत्रणाही उन्हामुळे तापलेली असल्याने अशातच वीज वितरण यंत्रणेचे तापमान अशा आगीमुळे वाढल्यास यंत्रणेलाही त्याचा फटका बसतो. उपरी वीजवाहिन्याखाली असलेल्या कचऱ्याचे ढीग पेटल्यामुळे किंवा त्याला आग लागल्यामुळे वीजतारा वितळून वीज खंडित होण्याचा धोका अधिक आहे. नागपूर शहरातील तसेच जिल्ह्यातील नागरिकांनी उघड्यावर असलेल्या वीजयंत्रणेला धोका निर्माण होईल अशा ठिकाणी कचरा टाकू नये किंवा साठवलेला कचरा जाळू नये. अशा घटनांतून वीजयंत्रणेला आग लागल्याचे आढळल्यास १९१२ किंवा १८००१०२३४३५ आणि १८००२३३३४३५ या टोल फ्री क्रमांकांवर किंवा नजीकच्या महावितरण कार्यालयाला त्याची सूचना देण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
शॉर्टसर्किटचाही धोका
घरगुती विद्युत उपकरणे आणि दिवे अति गरम झाल्याने शॉर्टसर्किटचा धोका होऊन आग लागण्याचीही शक्यता असते. घरगुती वायरिंग किंवा नादुरुस्त स्वीचेस आणि उपकरणांमुळेही शॉर्टसर्किट होण्याची शक्यता आहे. इलेक्ट्रिकल आऊटलेट्स किंवा एक्स्टेन्शन कॉड ओव्हरलोड झाल्यास याशिवाय वायरिंगमध्ये कित्येक वेळी सैल जोड वा कनेक्शन असतात, कालांतराने हे जोड काबरेनाइज होतात. कधी कधी हे जोड सैल असल्यामुळे व त्याला घट्ट इन्सुलेशन न केल्यामुळे उंदीर, पाल आदी या वायर कुरतडतात व हळूहळू त्यामुळे स्पार्किंग सुरू होते व प्रसंगी शॉर्टसर्किट होऊन आग लागण्याची संभावना असते, अशा वेळी प्रथम घरातील मेन स्वीच बंद करावा व मगच पाणी न वापरता कार्बनडाय आॅक्साईड, कोरडी रेती यांच्या साह्याने आग विझविण्याचा प्रयत्न करावा. त्यापूर्वी याची सूचना अग्निशमन विभागाला देण्याचे आवाहनही महावितरणतर्फे करण्यात आले आहे. नॅशनल इलेक्ट्रिक कोड २०११ प्रमाणे वायरिंगचे आयुष्य २० ते २५ वर्षे असावे, असे निर्देश आहेत. घरगुती वायरिंगला २० वर्षे झाल्यावर ग्राहकाने एखाद्या मान्यताप्राप्त किंवा महाराष्ट्र शासनाचा अनुज्ञप्तीधारक विद्युत कंत्राटदाराकडून आवश्यक त्या चाचण्या करून घेत त्याच्या सूचनेनुसार वायरिंग बदलून घेण्याचे आवाहनही महावितरणतर्फे करण्यात आले आहे.