छोडेंगे न तेरा साथ ओ साथी मरते दम तक
By Admin | Updated: October 10, 2015 02:59 IST2015-10-10T02:59:29+5:302015-10-10T02:59:29+5:30
ज्येष्ठ संगीतकार आणि आपल्या जादुई संगीताने रसिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणारे रवींद्र जैन यांचे शुक्रवारी लीलावती रुग्णालयात...

छोडेंगे न तेरा साथ ओ साथी मरते दम तक
ज्येष्ठ संगीतकार रवींद्र जैन यांचे निधन : नागपूरकरांनी व्यक्त केल्या शोकसंवेदना
नागपूर : ज्येष्ठ संगीतकार आणि आपल्या जादुई संगीताने रसिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणारे रवींद्र जैन यांचे शुक्रवारी लीलावती रुग्णालयात दुपारी ४ वाजून १० मिनिटांनी निधन झाले. मूत्रपिंडाचा आजार बळावल्याने उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. नागपुरातील एका कार्यक्रमासाठी ते ३ आॅक्टोबरला आले होते. पण प्रकृतीचा त्रास झाल्याने त्यांना कार्यक्रमाला उपस्थित राहता आले नाही. त्यांच्या अचानक निधनाने संगीत, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त केला. ‘छोडेंगे न हम तेरा साथ..ओ साथी मरते दम तक....’ म्हणणाऱ्या रवींद्र जैन यांनी अखेरपर्यंत रसिकांच्या सेवेत स्वत:ला झोकून देत त्यांचे म्हणणे खरे केले.
रवींद्र जैन यांच्या चाहत्यांना यावेळी अश्रू अनावर झाले. त्यांनी संगीतबद्ध केलेल्या गीतांच्या कार्यक्रमासाठी ते नागपुरात आले होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे कार्यक्रम टाळून त्यांना ‘प्लॅटिना’ रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर नागपुरातील वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. बुधवारी त्यांना मुंबईतील लीलावती इस्पितळात दाखल करण्यात आले. डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. नागपुरातील कार्यक्रमात त्यांनी प्रत्येक गीताची चाल कशी बांधली आणि त्याचे संगीत कसे सुचले, या आठवणी सांगणार होते. त्यांना ऐकण्यासाठी चाहत्यांनी कार्यक्रमाला गर्दी केली होती. पण कार्यक्रमापूर्वीच त्यांना मूत्रपिंडाचा त्रास झाला. याप्रसंगी त्यांच्या बंधूंनी कार्यक्रमात येऊन चाहत्यांची माफी मागितली होती. तीन वर्षापूर्वी अपंग वित्त विकास महामंडळाच्यावतीने अपंग साहित्य संमेलनाचे आयोजन दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रात करण्यात आले होते. त्यावेळी तब्बल दोन दिवस रवींद्र जैन नागपुरात थांबले होते. कार्यक्रमात ते प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते पण त्यांच्या चाहत्यांनी त्यांना गीत सादर करण्याची विनंती केली. चाहत्यांचा प्रतिसाद पाहून त्यांनी छोटेखानी कार्यक्रमही सादर केला होता. या कार्यक्रमाला नागपूरकरांची पसंती लाभली. त्यानंतर रवींद्र जैन यांनी निवांतपणे सर्व चाहत्यांशी संवादही साधला. त्यामुळे रवींद्र जैन यांच्याशी नागपूरकर खास जुळले होते. तीन वर्षानंतर त्यांच्या गीतांचा आणि संगीताचा प्रवास समजून घेण्यासाठी चाहते उत्सुक होते. त्यांची सर्व गीते या कार्यक्रमात सादर करण्यात आली पण रवींद्र जैन प्रकृती अस्वास्थ्यामुळे कार्यक्रमात उपस्थित राहू शकले नाही. यामुळे नागपूरकर रसिक हिरमुसले. त्यांची प्रकृती लवकर बरी व्हावी म्हणून प्रार्थना करीत असतानाच त्यांची प्राणज्योत मालवल्याने नागपूरकरांनी अश्रूंना वाट मोकळी केली. (प्रतिनिधी)