हिवाळी अधिवेशन काळात शहरात खोदकाम करू नका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 15:58 IST2024-12-12T15:57:46+5:302024-12-12T15:58:31+5:30

Nagpur : कंत्राटदार व विकासकांना महावितरणचे आवाहन

Do not dig in the city during the winter session. | हिवाळी अधिवेशन काळात शहरात खोदकाम करू नका

Do not dig in the city during the winter session.

लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर :
१६ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी आणि अधिवेशनादरम्यान कुठल्याही यंत्रणेने किंवा नागरिकांनी शहरात खोदकाम करु नये, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे. आपत्कालीन परिस्थितीत काही खोदकाम करणे आवश्यक असल्यास अशा खोदकामाची महावितरणला पूर्वसूचना दिल्यास होणारे नुकसान टळून ग्राहकांनाही त्रास होणार नाही, असे महावितरणच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.


हिवाळी अधिवेशनादरम्यान शहरातील वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणने युद्धस्तरावर तयारी ठेवली असून, यासाठी शहरातील सर्व विकास यंत्रणांनी सहकार्य करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. नागपूर शहरात मेट्रो, सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पाणीपुरवठा, महानगरपालिका, दूरसंचार विभाग, खासगी इंटरनेट आणि केबल टीव्ही कंपन्या यासारख्या अनेक विभागांमार्फत मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरु असून, त्यासाठी अनेक ठिकाणी मोठमोठ्या ड्रील मशीन्सच्या सहाय्याने खोदकामही करण्यात येत आहे. 


व्हीव्हीआयपी परिसरात वीज कर्मचारी २४ तास तैनात 
हिवाळी अधिवेशन काळात व्हीव्हीआयपी परिसरात वीजपुरवठा खंडित होऊ नये, यासाठी महावितरणकडून येथे पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. एका लाइनमध्ये बिघाड झाल्यास दुसऱ्या लाइनमधून वीजपुरवठा करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. वीजपुरवठा सुरळीत राखण्यासोबतच कर्मचारी २४ तास कार्यरत राहणार आहेत. विधिमंडळ, झीरो माईल्स, राजभवन, रामगिरी, देवगिरी, रविभवन, नाग भवन, आमदार निवास, न्यू हैदराबाद हाऊस, मुख्यमंत्री सचिवालय आणि १६० खोल्यांचे गाळे या व्हीव्हीआयपी परिसरातील वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी वीज यंत्रणा आणि पायाभूत सुविधांच्या देखभालीचे काम पूर्ण करण्यात आले आहे. वीजपुरवठ्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे, असे महावितरणतर्फे कळविण्यात आले आहे.


अधिकाऱ्यांनी घेतला आढावा 
विधिमंडळ, राजभवन, रविभवन, नागभवन आणि इतरही भागात अधिवेशन काळात तेथील वीज वितरण यंत्रणा सुरळीत ठेवण्याबाबत महावितरणचे मुख्य अभियंता दिलीप दोडके, अधीक्षक अभियंता अमित परांजपे आणि कार्यकारी अभियंते हेमराज ढोके आणि राजेश घाटोळे, शंकरनगर, धंतोली, सिव्हिल लाईन्स, एमआरएस या भागातील महावितरण अभियंते यांनी विधानभवन परिसर आणि इतर संबंधित उपकेंद्रांना भेट देत तेथील संपूर्ण व्यवस्थेचा आढावा घेत सर्व संबंधितांना आवश्यक त्या सूचना केल्या.

Web Title: Do not dig in the city during the winter session.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.