कुत्रे, मांजरी, गायी, म्हशींना मराठी येते की इंग्रजी ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 11:08 IST2025-04-07T11:05:31+5:302025-04-07T11:08:06+5:30
Nagpur : प्राण्यांना मानवी भाषा समजते का, यावर वैज्ञानिकांचा अभ्यास

Do dogs, cats, cows, and buffaloes speak Marathi or English?
निशांत वानखेडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ज्यांच्या घरी श्वान असेल, ते बहुतेक लोक त्यांच्या श्वानाशी बोलताना दिसतात. बॉल किंवा अमुक वस्तू आणून दे, असे सांगितल्यावर तो पटकन त्याप्रमाणे कृती करतो. पोलिस प्रशासन किंवा सैन्यदलातील प्रशिक्षित श्वान त्यांच्या प्रशिक्षकांच्या आदेशाप्रमाणे कृती करताना आपण पाहतो. शेतकरीसुद्धा त्यांच्या बैलांशी, घरच्या गायी, म्हशींशी बोलताना दिसतात. मग या प्राण्यांना त्यांच्या मालकांचे शब्द खरोखर कळतात का? आता तर पालघरमध्ये कावळाच बोलतांना दिसून आला. एकूणच मानवी भाषेचे किती आकलन प्राण्यांना होते, यावर वैज्ञानिकांचा अभ्यास बऱ्याच वर्षांपासून सुरू आहे.
क्लेव्हर हान्स नामक घोड्याला जर्मन भाषा कळते, असे त्याच्या प्रशिक्षकाने सांगितले होते. अनेकदा गर्दीपुढे त्याने घोड्याचे प्रात्याक्षिकही दाखविले. हा घोडा गणिताचे प्रश्नही सोडवितो, असा दावा प्रशिक्षकाने केला होता. पुढे एका स्वतंत्र टीमने अभ्यास केला, तेव्हा हे सर्व बनावट असल्याचे लक्षात आले होते. यानंतर संशोधकांनी यावर अभ्यासाचे सत्रच सुरू केले. संशोधकांनी चिंपाझी (प्रिमेट्स), पक्षी, डॉल्फीन व इतर प्राण्यांचा अभ्यास केला. या प्राण्यांना मालक किंवा प्रशिक्षकांचे काही हावभाव, आदेश कळतात पण मानवी भाषा नाही, हे मान्य केले आहे. काही काळाच्या प्रशिक्षणानंतर प्राण्यांना शारीरिक हावभाव किंवा विशिष्ट शब्द कळतात, हे मात्र मान्य करण्यात येते. मात्र, भाषेचे व्याकरण त्यांना कळते, हे अद्याप तरी शक्य झाले नाही.
झुरिक विद्यापीठातील उत्क्रांतीवादी मानववंशशास्त्राचे प्राध्यापक सायमन टाउनसेंड यांच्या मते मानव अनेक अर्थाने खास आहेत आणि निश्चितच भाषा ही मानवांसाठी अद्वितीय आहे. माकडे मानवी भाषा शिकू शकतात का? कोको व कांझीची गोष्ट अमेरिकेत 'कोको' नामक गोरिल्लावर झालेला प्रयोग प्रसिद्ध आहे. या कोकोला अमेरिकन सांकेतिक भाषा येत होती. तिला १००० चिन्हे आणि इंग्रजी भाषेतील २००० शब्द ओळखता येत असल्याचे बोलले जाते. २०१८ साली तिचे निधन झाले. दुसरे उदाहरण 'कांझी' नामक नर बोनोबोचे आहे. मानसशास्त्रज्ञ आणि भाषाशास्त्रज्ञ मायकेल टोमासेलो यांनी हा अभ्यास केला होता. हा कांझी एका २०० चिन्हांच्या लेक्सिग्राम बोर्डद्वारे संवाद साधत असे. कांझीसोबत काम करणारे टाउनसेंड यांनी सांगितले, बोनोबोला लेक्सिग्राम बोर्डवरील चिन्हे चांगली समजत होती आणि तो त्याच्या प्रशिक्षकांशी संवाद साधण्यासाठी त्यांचा वापर करू शकत होता. कांझी लोकांची नावे, सामान्य वस्तू, कृती आणि स्थाने यासाठी प्रतीकांचा वापर करत असे आणि 'यस' आणि 'नो' हे शब्द उच्चारत असे. या कांझीचा नुकताच ४५ व्या वर्षी २०२५ ला मृत्यू झाला. तज्ज्ञ आणि टीकाकारांच्या मते कोको आणि कांझीला मानवी भाषा समजण्याची मर्यादा आहे.
श्वानांना सर्वाधिक मानवी भाषेची समज
श्वान हे १४,००० वर्षापासून मानवाचे सोबती आहेत. त्यांना मानवी भाषेची सर्वाधिक समज आहे, असे मानले जाते. कॅलिफोर्निया विद्यापीठ, सॅन डिएगोचे सहायक प्राध्यापक फेडरिको रोसॅनो यांनी अनेक श्वानांवर इंग्रजी भाषेच्या कृतीचा सखोल अभ्यास केला. २०११ च्या अभ्यासानुसार 'जगातील सर्वात स्मार्ट श्वान' अशी ओळख असलेली 'चेसर' नामक कुत्रीला इंग्रजीचे १००० शब्द अवगत होते व ती दिलेल्या आदेशाचे तंतोतंत पालन करीत होती. खेळायचे आहे, बाहेर जायचे आहे, असे म्हटल्यावर ती त्याप्रमाणे कृती करीत होती. तिला 'अन्न' या शब्दाचेही ज्ञान होते. मात्र, एकाच उच्चाराचे शब्द समजण्यास तिलाही मर्यादा होती. कुत्रे आठ आठवड्यांचे असल्यापासूनच मानवी आवाज आणि हावभावांमध्ये रस दाखवतात. कुत्र्यांना मानवी आवाजांची सवय असते. न्यूरोसायन्स संशोधनानुसार कुत्र्यांना शब्दांची स्वतःची मानसिक ओळख असते. आवाज आणि स्वरांशी कुत्रे खूप परिचित असतात.