खरंच मधमाश्या नृत्य करतात का? कोणी पाहिलंय का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 11:05 IST2025-03-10T11:03:33+5:302025-03-10T11:05:32+5:30
Nagpur : मधमाश्यांचे नृत्य कसे असते, त्या नृत्याचे प्रयोजन काय, अशा अनेक प्रश्नांचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न कीटकशास्त्र अभ्यासकांकडून होत आहे.

Do bees really dance? Has anyone seen one?
निशांत वानखेडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जैवविविधता वाढीसाठी सर्वांत महत्त्वाचा घटक कोणता असेल, तर तो आहे मधमाश्या. त्यांच्यामुळे मध मिळते हा मानवी लाभाचा विषय; पण जगभरात वनस्पतींचा वेगाने प्रसार करण्यात मधमाश्यांचे योगदान मोठे आहे; पण मथळ्यातील प्रश्न तुम्हाला बुचकळ्यात टाकणारा असेल. मधमाश्यांची एक राणीमाशी असते, हे आपल्याला माहिती आहे; पण त्या डान्स करतात, ही काय भानगड? असे तुम्हाला वाटेल.
होय मित्रांनो, मधमाश्या नृत्य करतात, अतिशय सर्जनशील नृत्य करतात. मधमाश्यांचे नृत्य कसे असते, त्या नृत्याचे प्रयोजन काय, अशा अनेक प्रश्नांचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न कीटकशास्त्र अभ्यासकांकडून होत आहे. मधमाश्यांच्या 'वेंगल डान्स'चा अभ्यास ८० वर्षांहून अधिक काळापासून केला जात असला तरी, त्याचे अनेक पैलू गूढ़ राहिले आहेत. अलीकडेच व्हर्जिनिया टेकच्या कीटकशास्त्र विभागातील सहयोगी प्राध्यापक मागरिट कुव्हिलॉन आणि सहसंशोधक लॉरा मॅकहेन्री यांनी यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला.
कशी असते मधमाश्यांची डान्स स्टाइल? मधमाश्या डान्स करतात, म्हणजे काय करतात? संशोधकांच्या अभ्यासानुसार मधमाश्या अन्न घेऊन पोळ्यात परतल्यानंतर छान नृत्य सादर करतात. उत्साहाने पोळ्यातून फिरतात, त्यांचे पोट हलवतात आणि पंख फडफडवतात. अंगाचा उपयोग सारखा असला तरी त्यांच्या प्रत्येकाच्या हालचाली मात्र वेगवेगळ्या असतात. म्हणजे नृत्यात एकरूपता नसते, तर विविधता असते. ही नृत्य शैली गुंतागुंतीची असल्याने त्याला 'तँगल डान्स' म्हटले जाते.
का करतात नृत्य?
संशोधकांच्या मते, हा त्यांच्या आनंदाचाच भाग आहे. हा आनंद त्यांना अन्न मिळाले हे दर्शवितो. या मधमाश्या इतरांना अन्न शोधण्यात मदत करण्यासाठी सर्जनशील नृत्य हालचाली करतात. हा त्यांच्या संवादाचा एक विशेष प्रकार आहे, जो घरट्यातील साथीदारांना मौल्यवान अन्नस्रोतांकडे निर्देशित करतो. नृत्याच्या हालचालीचा कोन अन्नाची दिशा आणि अंतर दर्शवितो आणि पोहोचण्यासाठी किती वेळ लागेल, हेही दर्शवितो. त्यांचे नृत्यप्रदर्शन यशस्वी झाले, की पोळ्यातील इतर माश्या त्या दिशेने अन्न शोधण्यासाठी बाहेर पडतात. नृत्य प्रदर्शन यशस्वी होईलच, असे नाही लाखो वर्षांच्या उत्क्रांतीनंतरही नृत्यशैली विकसित झाली असली तरी हा वेंगल डान्स नेहमीच काम करील, असे नाही. अनेकदा मधमाश्या त्यांच्या घरट्यातील सोबत्याने दर्शविलेले अन्न शोधण्यात अपयशी ठरतात. ते का, हा संशोधकांसाठी बराच काळ गोंधळ उडविणारा विषय होता. कुव्हिलॉन व मॅकहेन्री यांच्या अभ्यासानुसार त्यांच्या नृत्यात एकरूपतेऐवजी विविधता असते. त्यामुळे साथीदार मधमाश्यांच्या चारा शोधण्याच्या मोहिमेवर परिणाम होतो.
असा केला अभ्यास
मधमाश्यांना एका पारदर्शक कापडाच्या पोळ्यात ठेवण्यात आले. त्यांचे २४ तास निरीक्षण करण्यासाठी विविध कोनांतून कॅमेरे लावण्यात आले.
पोळ्याच्या पारदर्शक भिंतीमुळे संशोधक डान्स फ्लोअरचा हाय-डेफिनिशन व्हिडीओ कॅप्चर करू शकले. त्याद्वारे अन्न शोधणाऱ्या माशा कोणत्या अन्नस्रोतावर आल्या, परतल्यानंतर त्यांनी कसे नृत्य केले व पोळ्यातील माश्यांनी कसे त्यांचे अनुकरण करून अन्न शोधण्यास निघाल्या, याचे प्रत्येक स्तरावर निरीक्षण केले आणि वेंगल डान्सच्या यश किंवा अपयशाचे कारण शोधण्याचा प्रयत्न केला.
भविष्यातील संशोधनाच्या दिशा
हा अभ्यास मधमाशी संवाद आणि सामाजिक संघटनेच्या संशोधनाचे नवीन मार्ग उघडणारा आहे. भविष्यात कोणत्या घटकांमुळे मधमाश्या लक्ष्य ओलांडण्यास प्रवृत्त होतात, हे समजेल किंवा पर्यावरणीय ताणतणाव मधमाश्यांना अधिक रुढीवादी किंवा अतिरंजित नृत्यांकडे ढकलू शकतात का, हे अभ्यासणे महत्त्वाचे ठरेल.