नागपूर जिल्ह्यात दोन लाखावर शेतकऱ्यांनी केले माती परीक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 01:35 IST2018-12-09T01:33:51+5:302018-12-09T01:35:47+5:30
मानवाच्या आरोग्याला जेवढे महत्त्व आहे तेवढेच महत्त्व जमिनीच्या आरोग्याला आहे. गेल्या काही वर्षांत शेतकऱ्यांचे जमिनीच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत होते. त्यामुळे जमिनीचा पोत घसरत चालला होता. त्याचा परिणाम मानवी आरोग्यावरही होत होता. शासनाने मानवी आरोग्य जपण्यासाठी सोबतच जमिनीचा पोत सुधारण्यासाठी जमिनीच्या आरोग्य तपासणीसाठी अभियान राबवून शेतकऱ्यांना आवाहन केले. त्याचा परिणाम म्हणून नागपूर जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात २ लाख ४७ हजार शेतकऱ्यांनी माती परीक्षण करून घेतले आहे.

नागपूर जिल्ह्यात दोन लाखावर शेतकऱ्यांनी केले माती परीक्षण
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मानवाच्या आरोग्याला जेवढे महत्त्व आहे तेवढेच महत्त्व जमिनीच्या आरोग्याला आहे. गेल्या काही वर्षांत शेतकऱ्यांचे जमिनीच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत होते. त्यामुळे जमिनीचा पोत घसरत चालला होता. त्याचा परिणाम मानवी आरोग्यावरही होत होता. शासनाने मानवी आरोग्य जपण्यासाठी सोबतच जमिनीचा पोत सुधारण्यासाठी जमिनीच्या आरोग्य तपासणीसाठी अभियान राबवून शेतकऱ्यांना आवाहन केले. त्याचा परिणाम म्हणून नागपूर जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात २ लाख ४७ हजार शेतकऱ्यांनी माती परीक्षण करून घेतले आहे.
जमिनीची उत्पादकता ही १६ अन्न घटकांच्या उपलब्धतेवर अवलंबून असते. यात मुख्य घटक म्हणजे हायड्रोजन, आॅक्सिजन, कर्ब, नत्र, स्फुरद व पलाश आहे. त्याचबरोबर इतर घटकांमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, गंधक, लोह, मंगल, तांबे, जस्त, मॉलिब्डेनम, बोरॉन, क्लोरीन यांचा समावेश आहे. शेतकऱ्यांनी गेल्या काही वर्षांत जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी रासायनिक खत, कीटकनाशकाचा अनावश्यक वापर केला आहे. त्यामुळे जमीन ही पिकांसाठी अनारोग्य ठरत आहे. अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे पिकांवर परिणाम होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसानही मोठ्या प्रमाणात होत आहे. जमिनीचे आरोग्य बिघडण्याचा धोका लक्षात घेऊन, संयुक्त राष्ट्राच्या ६८ व्या सर्वसाधारण सभेत २०१५ हे वर्ष आंतरराष्ट्रीय मृदा वर्ष म्हणून घोषित करण्यात आले. केंद्र सरकारने तर मृदा सर्वेक्षणाच्या बाबतीत मृद आरोग्यपत्रिका अभियानच राबविले आहे. याअंतर्गत केंद्र व राज्य शासनाच्या सहाय्याने राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत जमीन आरोग्यपत्रिका ही योजना २०१५ पासून कार्यान्वित करण्यात आली आहे.
जिल्हा मृद चाचणी व मृदा सर्वेक्षण कार्यालयांतर्गत २ लाख ६८ हजार शेतकऱ्यांची नोंद आहे. यातील २०१७-१८ मध्ये १ लाख १६ हजार शेतकऱ्यांनी मातीची तपासणी केली आहे तर २०१८-१९ मध्ये १ लाख ३१ हजार शेतकऱ्यांनी तपासणी केली आहे.
दोन वर्षातून एकदा शेतकऱ्यांनी तपासणी करणे गरजेचे आहे. आरोग्यपत्रिकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जमिनीचा रासायनिक गुणधर्म स्थिती, प्रमुख अन्नद्रव्याची पातळी, सूक्ष्म मूलद्रव्य कमतरता आदी माहिती शेतकऱ्यांना देण्यात येत आहे. त्यामुळे खतांचा संतुलित व कार्यक्षम वापरास प्रोत्साहन मिळत आहे.
अर्चना कोसरे, जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी अधिकारी