जिल्ह्यात अतिवृष्टी
By Admin | Updated: July 24, 2014 00:59 IST2014-07-24T00:59:30+5:302014-07-24T00:59:30+5:30
बुधवारी सकाळी संपलेल्या २४ तासात नागपूर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. सर्वाधिक पाऊस नरखेड (१५६.२० मि.मी.) तालुक्यात झाला. नागपूर जिल्ह्यात

जिल्ह्यात अतिवृष्टी
अनेक घरांची पडझड : १३ जनावरे दगावली, भिवापूर परिसरातील रस्ते बंद
नागपूर : बुधवारी सकाळी संपलेल्या २४ तासात नागपूर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. सर्वाधिक पाऊस नरखेड (१५६.२० मि.मी.) तालुक्यात झाला. नागपूर जिल्ह्यात १३०.९७ मि.मी पाऊस पडला. रामटेक तालुक्यात १५५ मि.मी, कामठी १४२ मि.मी, उमरेड १३५.१० मि.मी., काटोल १३३.४० मि.मी., कुही १२८.४० मि.मी, पारशिवनी १२८ मि.मी. सावनेर १२६.६० मि.मी. मौदा १२१.४० मि.मी., हिंगणा १२०.३० मि.मी., भिवापूर १०७ मि.मी., तसेच कळमेश्वर तालुक्यात १०३ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. १ जून ते २३ जुलैपर्यंत एकूण ४४७.८४ मि.मी.(१०३ टक्के) पाऊस झाला.
मौदा
तालुक्यात तीन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. दहेगाव तसेच गोवरी-खरबी दरम्यान असलेल्या पुलावरून पाणी वाहत आहे. सांड नदी दुथडी वाहत आहे. परिणामी मोहाडी - बोरगाव हा मार्ग बंद झाला आहे. धानला - चारभा, घोटमुंढरी - खात, रेवराल - धर्मापुरी, लापका माार्गवरील रपट्यावरून पाणी वाहत असल्याने तो मार्गसुद्धा बंद झाला आहे. चिचोली - दहेगाव - खात मार्ग बंद झाला आहे. भंडारा - रामटेक मार्गावरील रपट्यांवरूनही पाणी वाहात असल्याने तो मार्ग बंद झाला आहे. पुरामुळे धामणगाव, आजनगाव, मांगलीतेली, भेंडाळा आदी अनेक गावांचा दुसऱ्या गावांसोबत संपर्क तुटला आहे. मौदा - निमखेडा मार्ग बंद झाला आहे. कन्हान - तारसा ज्वॉर्इंट - तारसा - अरोली हा मार्ग बंद झाला आहे. नानादेवी, किरणापूर, कुंभापूर, कोपरा या गावादरम्यान असलेल्या पुलावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे माथनी येथील शेतकऱ्यांना मोठ्या पुलावरून फेरा मारून शेतात ये-जा करावी लागत आहे. मौदा तालुक्यात शनिवारी ८.६ मिमी, रविवारी २८.६, सोमवारी २९.४, मंगळवारी सकाळपर्यंत ४६.२ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. १ जूनपासून २२ जुलैपर्यंत एकूण ४०२.८ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.
कळमेश्वर
तालुक्यात गेल्या २४ तासांत १०३ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. सर्व नदी- नाल्यांना पूर आला. ६० पेक्षा अधिक घरांचे अंशत: नुकसान झाले. तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने बुधवारी दुपारच्या सुमारास विश्रांती घेतली. मात्र वारा वेगाने वाहात होता. पूरपरिस्थितीवर तहसील प्रशासनाची नजर असून यंत्रणा सज्ज आहे.
भिवापूर
मुसळधार पावसामुळे मरु, नक्षी, चिखली या नद्या दुथडी भरून वाहात आहे. सर्वत्र पूरसदृशस्थिती निर्माण झाली आहे. बुधवारी सकाळपर्यंत भिवापूर येथे १०७ मिमी, कारगाव येथे १३४.८, नांद येथे ११७ तर मालेवाडा येथे ३५ मिमी पावसाची नोंद करण्यात आली.
नक्षी, चिखली, नांद, चिखलापार नदीला पूर आल्याने भिवापूर - चंद्रपूर, भिवापूर - जवळी, नांद - गिरड व उमरेड - गिरड - हिंगणघाट मार्गावरील वाहतूक पूर्णत: ठप्प पडली. पुरामुळे नदी काठावरील शेतातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले.
कामठी
तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाचा जोर बुधवारी दुपारच्या सुमारास कमी झाला. कन्हान नदी दुथडी भरून वाहात आहे. कामठी परिसरात बुधवारी १४६.६ मिमी, कोराडी १३२.६, वडोदा ११२.२, दिघोरी परिसरात ११३.४० मिमी पावसाची नोंद करण्यात आल्याची माहिती तहसलीदार विद्यासागर चव्हाण यांनी दिली. पावसामुळे शासकीय कार्यालय, शाळा - महाविद्यालयात शुकशुकाट होता.
कुही
रविवारपासून सुरू असलेल्या पावसाने बुधवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास उसंत दिली. त्यामुळे जनजीवन पूर्वपदावर आले. मंगळवारी रात्री वडोदा मार्गावरील नाग नदीच्या पुलावरून पाणी वाहात असल्याने बुधवारी सायंकाळपर्यंत या मार्गावरील वाहतूक ठप्प पडली होती. उमरेड - कुही, कुही - नागपूर मार्गावरील वाहतूकही काही वेळ बंद होती. पूर ओसरताच वाहतूक सुरू झाली. तालुक्यात बुधवारी सकाळपर्यंत १३२.१७ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. पावसामुळे तीन घरांची पडझड झाली. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणची झाडे उन्मळून पडली.
पचखेडी येथे विद्युतपुरवठा करणाऱ्या विजेच्या तारा तुटल्या. याबाबत वीज वितरणला माहिती मिळताच तातडीने हजर होऊन वीजपुरवठा सुरळीत केला. या परिसरात तितूर येथे १२५.४, राजोली १३६.२, मांढळ १३१.२, पचखेडी १५२, वेलतूर येथे १२०.१ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. (प्रतिनिधींकडून)
१३ जनावरे दगावली
काटोल तालुक्यात गेल्या २४ तासांत १३० मिमी पावसाची नोंद करण्यात आली. संततधार पावसामुळे तालुक्यातील ७३ गावांतील ३४० घरांचे अंशत: नुकसान झाले. डोरली (भिंगारे) येथील सात, पारडसिंगा, चंदनपारडीसह इतर गावातील असे सहा अशी एकूण १३ जनावरे दगावली. डोरली भिंगारे येथील चंद्रभान ठाकरे यांच्याकडे धुरखेडा (बोरगाव) येथील २० जनावरे चराईसाठी होती. मात्र गेल्या तीन दिवसांपासून संततधार पावसामुळे जनावरांना चराईसाठी बाहेर नेता आले नाही. तसेच त्यांच्याकडे चारासाठा नसल्याने ती जनावरे एका जागेवर बांधून होती. त्यातच त्यातील सात जनावरे दगावली. त्यांच्याकडील १७ जनावरे आजारी आहेत. पारडसिंगा येथे एक म्हैस तर मसाळा येथे एक बैल, एक गाय दगावली. आजारी जनावरांवर पशुसंवर्धन अधिकारी डॉ. अनिल ठाकरे यांच्या मार्गदर्शनात डॉ. लाडुकर, डॉ. चिमोटे, डॉ. पखाले, डॉ. घोडमारे उपचार करीत आहे. संततधार पावसामुळे मूर्ती येथील जिल्हा परिषद शाळेची कुंपण भिंत तसेच चाफ्याचे मोठे झाड पडले. नदी-नाले दुथडी वाहात असून नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिल्याचे तहसीलदार सचिन गोसावी यांनी सांगितले.