रिफार्म क्लबवरील जुगार धाडीने जिल्हाधिकारी अडचणीत
By Admin | Updated: September 5, 2014 01:06 IST2014-09-05T01:06:34+5:302014-09-05T01:06:34+5:30
रिफार्म नामक मनोरंजन क्लबमधील जुगार अड्डयावर धाड घालून पोलिसांनी २० जुगाऱ्यांना रंगेहाथ अटक केली होती. पोलिसांच्या या धाडीने मोठा तिढा निर्माण झाला आहे. या क्लबचे पदसिद्ध अध्यक्ष विद्यमान

रिफार्म क्लबवरील जुगार धाडीने जिल्हाधिकारी अडचणीत
सतीश येटरे - यवतमाळ
रिफार्म नामक मनोरंजन क्लबमधील जुगार अड्डयावर धाड घालून पोलिसांनी २० जुगाऱ्यांना रंगेहाथ अटक केली होती. पोलिसांच्या या धाडीने मोठा तिढा निर्माण झाला आहे. या क्लबचे पदसिद्ध अध्यक्ष विद्यमान जिल्हाधिकारी असतात. त्यामुळे आता जुगारप्रकरणात दस्तुरखुद्द जिल्हाधिकारीच अडचणीत सापडले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांची ही डोकेदुखी दूर करण्याची जबाबदारी कारवाई करणाऱ्या पोलिसांवरच येऊन पडली आहे. त्यामुळे त्यांना वाचविण्यासाठी आता पळवाटा शोधल्या जात आहे.
सुमारे आठ दिवसांपूर्वी रात्री ११ वाजता गोपनीय माहितीवरून येथील रिफार्म क्लबवर उपविभागीय पोलीस अधिकारी राहूल मदने यांच्या पथकाने धाड घातली. यावेळी शहरातील प्रतिष्ठीत जुगाऱ्यांना रंगेहाथ अटक करण्यात आली. त्यात हॉटेल मालक, प्रसिध्द स्वीट मार्टचा मालक, प्रसिध्द छायाचित्रकार, आर्कीटेक्चर, स्टील भांड्याचा व्यापारी, एका फायनान्स कंपनीचा प्रतिनिधी आदी २० जणांचा समावेश होता.
जुगाऱ्यांना अटक केल्यानंतर त्यांना ‘व्हीआयपी’ ट्रिटमेंट देऊन रेकॉर्डवर मुद्देमालाची थातूर-मातूर जप्ती दाखविल्याच्या वावड्या उठल्या होत्या. त्याची सारवासारव होत नाही तोच, या कारवाईने जुगाराशी काही एक संबंध नसलेले दस्तुरखुद्द जिल्हाधिकारी अडचणीत आल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी या बाबीची वाच्यता होेऊ नये म्हणून प्रचंड गोपनीयता बाळगली. परंतु या धाडीने दुखावलेल्या प्रतिष्ठित जुगाऱ्यांनी त्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांच्या कानापर्यंत पोहोचवलीच. आता पोलिसांकडून जिल्हाधिकाऱ्यांना वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी विधी सल्लागारांचेही मार्गदर्शन घेण्यात आल्याची माहिती आहे.