प्रलंबित अर्जाचा निपटारा झटपट
By Admin | Updated: July 20, 2014 01:16 IST2014-07-20T01:16:36+5:302014-07-20T01:16:36+5:30
सेतू केंद्रातील विविध प्रमाणपत्रांसाठी आलेल्या अर्जांचा निपटारा झटपट करण्यासाठी यंत्रणेला कामाला लावले आहे. पुढच्या काळात केंद्राकडे अर्ज आल्यावर तीन दिवसात त्याचा निपटारा करण्याचे

प्रलंबित अर्जाचा निपटारा झटपट
सेतू केंद्र : जिल्हाधिकाऱ्यांचे यंत्रणेला आदेश
नागपूर: सेतू केंद्रातील विविध प्रमाणपत्रांसाठी आलेल्या अर्जांचा निपटारा झटपट करण्यासाठी यंत्रणेला कामाला लावले आहे. पुढच्या काळात केंद्राकडे अर्ज आल्यावर तीन दिवसात त्याचा निपटारा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासंदर्भात शनिवारी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी नायब तहसीलदारांची बैठक घेतली आणि त्यांना कामाच्या नियोजनाची माहिती दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू केंद्रातून बाराही महिने प्रमाणपत्र वाटप करण्याची सोय आहे. पण दरवर्षी शाळा-महाविद्यालयांच्या प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यावरच पालक प्रमाणपत्रासाठी गर्दी करतात. एकाच वेळी हजारोंच्या संख्येने आलेल्या अर्जांमुळे केंद्राचे नियोजन कोलमडते. अधिकाऱ्यांना त्यांचे मूळ काम करून अर्जांचा निपटारा करायचा असल्याने कार्यव्यस्ततेमुळे त्यांच्याकडेही अर्ज प्रलंबित राहतात. दुसरीकडे वेळेत प्रमाणपत्र न मिळाल्याने पालक व विद्यार्थ्यांची गैरसोय होते. यंदाही हेच चित्र सेतू केंद्रात आहे.
निवडणुका, मदत वाटप आणि नियमित कामात प्रशासकीय यंत्रणा गुंतल्याने प्रलंबित अर्जांची संख्या वाढली होती. त्याला गती देण्याचा प्रयत्न सेतू व्यवस्थापनाकडून झाले. मात्र दैनंदिन अर्जांची त्यात भर पडत गेल्याने गाडी रुळावर आली नाही. काही उपजिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या नाहक त्रुटी याला कारणीभूत ठरल्या. लोकांच्या तक्रारी वाढल्यावर जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा यांनी पुन्हा या प्रकरणात लक्ष घातले. सेतू व्यवस्थापन सांभाळणाऱ्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन अर्ज प्रलंबित असण्याची कारणे जाणून घेतली व यासंदर्भात नियोजन करण्याचे आदेश दिले. (प्रतिनिधी)
असे आहे नियोजन
नव्या नियोजनानुसार सेतू केंद्रात आलेल्या अर्जाचा निपटारा तीन दिवसात करणे आवश्यक आहे. त्यासाठी नायब तहसीलदार आणि उपजिल्हाधिकाऱ्यांना केंद्रात बसविण्यात येणार आहे. त्यांच्यासाठी सुयोग्य जागा तयार करण्यास सांगण्यात आले आहे. प्रत्येक दिवशी आलेल्या अर्जावर सेतू केंद्राने त्याच दिवशी आवश्यक ती कारवाई करून तपासणीसाठी तयार करायचे आहे. दुसऱ्या दिवशी एक नायब तहसीलदार सेतू केंद्रात येऊन अर्जाची तपासणी करतील. त्यानंतर दोन दिवसात उपजिल्हाधिकाऱ्यांकडून या प्रकरणाचा निपटारा करतील. सध्या सेतूतील प्रकरणे नायब तहसीलदार व उपजिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविली जात होती केंद्रात बाहेरच्या व्यक्तींना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. नव्याने रेकॉर्ड रूम तयार करण्यात येणार आहे.
भरारी पथकाला लावले कामाला
दलालांना हुसकावून लावण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या भरारी पथकाला जिल्हाधिकाऱ्यांनी कामाला लावले आहे. शनिवारी या पथकाची निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन दिवसातून तीन वेळा सेतू केंद्राला भेट देण्याचे आदेश दिले आहे. तहसील कार्यालयातील सेतू केंद्रातही दलालांचा सुळसुळाट आहे. तेथे तर प्रमाणपत्रासाठी रांगेत लागलेल्या पालकांना दलालांकडून विचारणा केली जाते. अधिकारी आणि पोलीस बघ्याची भूमिका घेतात हे येथे उल्लेखनीय.