लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दैनंदिन वापरातील गोष्टींच्या स्वच्छतेकडे विशेष भर दिला जात आहे. आवश्यक गरज बनलेला मोबाईलला द्रव पदार्थांनी स्वच्छ करणे जिकीरीचे काम आहे. हीच बाब लक्षात घेऊन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील प्राध्यापकाने संशोधन केले व अल्ट्राव्हायोलेट तंत्रज्ञानाच्या आधारावर चालणाऱ्या दोन उपकरणांची निर्मिती करण्यात त्यांना यश आले. या उपकरणांच्या उपयोगाने मोबाईल फोनसह भाज्यांचेदेखील सहज निर्जंतुकीकरण करणे शक्य होणार आहे, असा दावा संशोधकांनी केला आहे. नागपूर विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागाचे प्रोफेसर डॉ. संजय ढोबळे व अमृतसर येथील डीएव्ही महाविद्यालयातील सहायक प्राध्यापक विभा चोप्रा यांनी हे संशोधन केले आहे.कोरोनावर अद्याप लस किंवा औषध मिळालेले नाही. यामुळे वापरातील वस्तूंचे निर्जंतुकीकरण आवश्यक झाले आहे. सर्वसामान्यपणे मोबाईल फोन लोक बहुतांश जागी घेऊनच जातात. मोबाईल फोनवर कोरोनाचा विषाणू ९६ तासांपर्यंत राहू शकतो असा दावा जगातील संशोधकांनी केला आहे. तर भाज्यांना शेत ते बाजार या प्रवासात विविध लोकांचे हात लागलेले असतात. त्यातून विषाणूंचा संसर्ग होण्याची शक्यता असते. त्यामुळे दोन्ही प्राध्यापकांनी यासंदर्भात संशोधनावर भर दिला. त्यांनी युव्ही तंत्रज्ञानावर चालणाऱ्या दोन उपकरणांची निर्मिती केली. दोन्हीचे पेटंट दाखल केले आहे. दवाखाने, कार्यालये, पोलीस स्थानक, शाळा, महाविद्यालये येथे त्यांचा उपयोग होऊ शकतो, अशी माहिती डॉ.संजय ढोबळे यांनी दिली.
असे चालते उपकरणअल्ट्राव्हायोलेट लाईटचा उपयोग करुन निर्जंतुकीकरण करण्यात येते. यात कुठलेही रसायन वगैरे राहत नाही. शिवाय निर्जंतुकीकरणामुळे स्मार्ट फोन, ताजी फळे, भाजीपाला, खाद्य पदार्थ, कपडे इत्यादी खराब होत नाहीत. हे उपकरण रेडिएशन तत्त्वावर तयार केले आहे. त्यामुळे अल्ट्राव्हायोलेट लॅम्प बंद केल्यानंतर हे उपकरण कुठेलच डिसइन्फेक्टंट मागे सोडत नाही. हे उपकरण सर्व बाजूंनी बंद असून त्यामुळे निर्जंतुकीकरणाचे नेमके प्रमाण मोजणे देखील शक्य आहे, असे डॉ.संजय ढोबळे यांनी सांगितले.