पावसाच्या निरुत्साहाने चिंता वाढवली : शेतकरी चिंतेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2020 01:35 IST2020-07-30T01:34:00+5:302020-07-30T01:35:10+5:30
जुलै महिन्यात नागपुरात सर्वाधिक पाऊस पडतो. मात्र यंदा जुलै संपायला आला तरी ढग मात्र बऱ्यापैकी शांतच आहेत. जून महिन्यात सामान्यापेक्षा ३० टक्क्यांवर असणारे पावसाचे आकडे २९ जुलै उलटायला आला तरी शून्य स्तरावर आहेत. अर्थात सरासरी असणारा पाऊस आपल्या स्तरावर आला आहे.

पावसाच्या निरुत्साहाने चिंता वाढवली : शेतकरी चिंतेत
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जुलै महिन्यात नागपुरात सर्वाधिक पाऊस पडतो. मात्र यंदा जुलै संपायला आला तरी ढग मात्र बऱ्यापैकी शांतच आहेत. जून महिन्यात सामान्यापेक्षा ३० टक्क्यांवर असणारे पावसाचे आकडे २९ जुलै उलटायला आला तरी शून्य स्तरावर आहेत. अर्थात सरासरी असणारा पाऊस आपल्या स्तरावर आला आहे.
नागपूर शहरामध्ये १ जून ते २९ जुलै या काळात ६५५.८ मिमी पाऊस झाला. जुलै महिन्यात आतापर्यंत ३७६.४ मिमी पाऊस पडला. महिना संपायला दोन दिवस बाकी आहेत. मात्र जोरदार पावसाची चिन्हे अद्याप नाहीत.
विदर्भात थंडावलेल्या मान्सूनच्या ढगांनी शेतकऱ्यांची चिंता वाढविली आहे. विदर्भात २९ जुलैपर्यंत ४१७.९ मिमी पाऊस पडला. सरासरीपेक्षा ही नोंद ९ टक्क्यांनी कमी आहे. हा सरासरी पाऊस ४५७.६ मिमी असतो. विदर्भातील अनेक जिल्ह्यात परिस्थिती खालावली आहे. गोंदियात सरासरीपेक्षा ४३, गडचिरोलीत २२, अकोल्यात २१, भंडाºयात १७, यवतमाळात १६ तर अमरावती जिल्ह्यात ६ टक्के पाऊस कमी पडला आहे. मात्र, वाशिममध्ये सरासरीपेक्षा २६ आणि बुलडाण्यात सरासरीपेक्षा १८ टक्के अधिक पाऊस पडला आहे.
नागपुरात ७.१ मिमी पावसाची नोंद
नागपुरात मंगळवारी रात्री हलका पाऊस झाला. बुधवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत ७.१ मिमी पावसाची नोंद झाली. या सोबतच चंद्रपूर जिल्ह्यात ३६.२, गडचिरोलीमध्ये २५.४, गोंदिया २०, अकोला १६.८, अमरावती २५.४, यवतमाळ ३१, वर्धा ६, वाशिम ४, बुलडाण्यात २ मिमी पावसाची नोंद झाली. नागपूर शहरात सकाळी आकाशात ढग होते. नंतर कडक ऊन पडले. यामुळे तापमान अधिक खालावले नाही. बुधवारी किमान तापमान सामान्यापेक्षा ३ टक्के अधिक नोंदविले गेले. सकाळी आर्द्रता ९० टक्के होती, सायंकाळी घटून ७२ टक्के झाली.