Director of education institute in Nagpur arrested in rape case | नागपुरातील शिक्षण संस्थेचा बलात्कारी संचालक गजाआड
नागपुरातील शिक्षण संस्थेचा बलात्कारी संचालक गजाआड

ठळक मुद्देरेल्वेस्थानक मार्गावर बांधल्या मुसक्या : नंदनवन पोलिसांची कामगिरी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्वत:च्या शेतातील आऊट हाऊसमध्ये राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा शिक्षण संस्थेचा बलात्कारी संचालक अशोक जयस्वाल (वय ५०) याच्या मंगळवारी रात्री नंदनवन पोलिसांनी मुसक्या बांधल्या.
एका सामाजिक संघटनेचा माजी अध्यक्ष असलेला आरोपी जयस्वाल एका शिक्षण संस्थेचा संचालक आहे. त्याने मध्य प्रदेशातील शिवनी येथील एक महिला, तिची १५ आणि १७ वर्षांची मुलगी तसेच २० वर्षांचा मुलगा या चौघांना स्वत:च्या शेतातील आऊट हाऊसमध्ये ठेवले होते. ऑक्टोबर २०१६ पासून त्याने १७ वर्षीय मुलीचा लैंगिक छळ सुरू केला. त्याने एकदा हैदराबादला नेले आणि तेथे तिला झोपेच्या गोळ्या खाऊ घालून तिच्यावर बलात्कार केला. तिला बदनामीचा तसेच मारण्याचा धाक दाखवून गप्प राहण्यास बजावले होते. मुलगी गप्प बसल्याने निर्ढावलेला जयस्वाल वारंवार पीडित मुलीवर बलात्कार करू लागला. तिच्यानंतर त्याने आपली विकृत नजर तिच्या लहान बहिणीवर (वय १५) वळवली. तिला कार्यालयात बोलवून तो तिच्यासोबत अश्लील चाळे करू लागला. हा प्रकार १० सप्टेंबरला उघड झाला. त्यामुळे नंदनवन पोलिसांनी जयस्वालविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला. तेव्हापासून तो फरार होता. अटक टाळण्यासाठी जयस्वालने अटकपूर्व जामीन मिळवण्याचा प्रयत्न केला. आधी जिल्हा आणि नंतर उच्च न्यायालयाने त्याचा अर्ज फेटाळला. दरम्यान, तो आज रात्री मध्य प्रदेशमधून बसने नागपुरात येणार असल्याचे कळताच, ठाणेदार विनायक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय मिलिंद तायडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सापळा लावला. रात्री १०.४५ च्या सुमारास तो मध्य प्रदेश बसस्थानकावर दिसताच नंदनवन पोलिसांनी त्याच्या मुसक्या बांधल्या.


Web Title: Director of education institute in Nagpur arrested in rape case
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.