सन्मानजनक तोडगा तरच काँग्रेससोबत आघाडी :आनंदराज आंबेडकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 20:31 IST2019-02-07T20:30:23+5:302019-02-07T20:31:28+5:30
काँग्रेससोबत चर्चा म्हणजे नेमकी कुणाशी चर्चा ? काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांचे म्हणणे त्यांचे हायकमांड ऐकतात का हा मुख्य प्रश्न आहे. आम्ही १२ जागांची मागणी केली आहे. जागांची अदलाबदली होऊ शकते. परंतु सन्मानजनक बोलणी झाली तरच काँग्रेससोबत आघाडी होईल, अन्यथा वंचित बहुजन आघाडी स्वबळावर लढण्यास तयार आहे, असे अॅड. प्रकाश आंबेडकर यांचे बंधू आणि रिपब्लिकन सेनाचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी येथे पत्रपरिषदेत बोलताना स्पष्ट केले.

सन्मानजनक तोडगा तरच काँग्रेससोबत आघाडी :आनंदराज आंबेडकर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : काँग्रेससोबत चर्चा म्हणजे नेमकी कुणाशी चर्चा ? काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांचे म्हणणे त्यांचे हायकमांड ऐकतात का हा मुख्य प्रश्न आहे. आम्ही १२ जागांची मागणी केली आहे. जागांची अदलाबदली होऊ शकते. परंतु सन्मानजनक बोलणी झाली तरच काँग्रेससोबत आघाडी होईल, अन्यथा वंचित बहुजन आघाडी स्वबळावर लढण्यास तयार आहे, असे अॅड. प्रकाश आंबेडकर यांचे बंधू आणि रिपब्लिकन सेनाचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी येथे पत्रपरिषदेत बोलताना स्पष्ट केले.
रमाई महोत्सवासाठी ते नागपुरात आले असता रविभवन येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी रमेश जाधव, योगेश चवरे, गिरीष पुलझेले, नरेश वाहाणे उपस्थित होते.
आनंदराज आंबेडकर म्हणाले, भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात दलित, पीडित, वंचित एकवटत आहे. शिवाय पुन्हा एकदा आंबेडकरी समाज आंबेडकर कुटुंबाच्या पाठीमागे असल्याचे चित्र आहे. त्यामुळे मोठी शक्ती निर्माण झाल्याने राज्यातील राजकारणात आमूलाग्र बदल होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. जेव्हा-जेव्हा समाज एक झाला त्याचे प्रतिनिधित्व संसदेसह विधानसभेत उमटले. येत्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी दोन अंकी आकडा नक्की गाठेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. सध्या तर भयावह परिस्थिती असून अल्पसंख्याक व आंबेडकरी समाजावरील अत्याचारात वाढ झाली आहे. हिंदू राष्ट्राच्या संकल्पना मांडल्या जात असतानाच संविधानच बदलण्याची भाषा मोदी सरकारमधील मंत्री करतात. तर शहरी नक्षलवादाच्या नावावर विचारवंतांना गोळ्या घातल्या जात असून कारागृहात सुद्धा डांबले जात आहे. समाजात मोठा असंतोष आहे. आरक्षणाचा नावावर तर चेष्टा सुरू आहे. उद्या विजय माल्ल्या देशात आला तर तो सुद्धा आरक्षणाचा दावा करू शकतो, अशी टीकाही त्यांनी केली.
प्रकाश आंबेडकर अकोल्यातूनच लढणार
वंचित बहुजन महाआघाडीला प्रत्येक जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. लाखोच्या सभा होत आहेत. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची अशी इच्छा आहे की, त्यांच्या जिल्ह्यातून अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी निवडणूक लढवावी. सोलापूर येथील कार्यकर्त्यांकडूनही अशी मागणी होत आहे. परंतु, अॅड. प्रकाश आंबेडकर हे अकोला येथूनच निवडणूक लढणार आहेत. आपण मात्र पडद्यामागील सूत्रे हलविणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.