डिझेल संपले, १०० बसेस ठप्प : नागपूरच्या गणेशपेठ आगारातील स्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2020 20:51 IST2020-01-10T20:49:48+5:302020-01-10T20:51:55+5:30
एसटीच्या गणेशपेठ आगारातील जवळपास १०० बसेस गुरुवारी डिझेल संपल्यामुळे आणि शुक्रवारी दुपारपर्यंत डिझेलचा टँकर न आल्यामुळे ठप्प झाल्या. डिझेलअभावी १७ हजार किलोमीटरच्या फेऱ्या रद्द करण्याची नामुश्की महामंडळावर आली.

डिझेल संपले, १०० बसेस ठप्प : नागपूरच्या गणेशपेठ आगारातील स्थिती
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एसटीच्या गणेशपेठ आगारातील जवळपास १०० बसेस गुरुवारी डिझेल संपल्यामुळे आणि शुक्रवारी दुपारपर्यंत डिझेलचा टँकर न आल्यामुळे ठप्प झाल्या. डिझेलअभावी १७ हजार किलोमीटरच्या फेऱ्या रद्द करण्याची नामुश्की महामंडळावर आली. त्यामुळे गणेशपेठ आगाराला तब्बल ३.५० लाखाचा फटका बसला. तर बसेस रद्द झाल्यामुळे हजारो प्रवाशांची गैरसोय होऊन त्यांना खाजगी वाहतुकीकडे वळावे लागले.
एसटी महामंडळाला अलीकडच्या काळात आर्थिक टंचाईचा सामना करावा लागत आहे. वेळेवर पैशांची जुळवाजुळव करून डिझेलच्या टँकरसाठी पैसे भरणे विभाग नियंत्रक कार्यालयाला जमले नाही. त्यामुळे गुरुवारी दुपारी ३ वाजता गणेशपेठ आगारातील डिझेल संपले. डिझेल संपण्यापूर्वी टँकर बुक करणे आवश्यक होते. परंतु पैशांअभावी विभाग नियंत्रक कार्यालयाने डिझेलच्या टँकरचे बुकिंग केले नाही. त्यामुळे गणेशपेठ आगारात उभ्या असलेल्या बसेसमधून डिझेल काढून ते लांब आणि मध्यम पल्ल्याच्या बसेसमध्ये टाकून या बसेस रवाना करण्यात आल्या. एसटीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी दुपारी ३ वाजेपासून शुक्रवारी दुपारी २ वाजेपर्यंत जवळपास १७ हजार किलोमीटरच्या फेऱ्या रद्द करण्याची नामुश्की एसटी महामंडळावर आली. यात १०० पेक्षा अधिक फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. यामुळे गणेशपेठ आगाराला ३.५० लाखाचा फटका बसला आहे. शुक्रवारी दुपारी २ वाजता डिझेलचा टँकर आल्यानंतर गणेशपेठ आगारातील बसेस नियमित सुरु झाल्या. परंतु प्रवासासाठी आलेल्या हजारो प्रवाशांना आल्यापावली परत जाण्याची पाळी आल्यामुळे त्यांची गैरसोय झाली. आजपर्यंत चालक, वाहक नसल्यामुळे बस फेऱ्या रद्द कराव्या लागत होत्या. परंतु डिझेल संपल्यामुळे बस फेऱ्या रद्द करण्याचा प्रकार मागील महिन्यापासून सुरु आहे. या परिस्थितीवर एसटी महामंडळाने गंभीरपणे विचार करून आर्थिक परिस्थिती सुधारण्याची गरज निर्माण झाली आहे.
प्रवासी कमी झाल्यामुळे आर्थिक टंचाई
थंडी आणि पावसामुळे अचानक एसटीचे प्रवासी कमी झाले. त्यामुळे एसटी महामंडळाच्या उत्पन्नात घट झाल्यामुळे डिझेलच्या टँकरसाठी पैशांची जुळवाजुळव करून पैसे भरणे अलिकडच्या काळात शक्य होत नाही. त्याचा परिणाम डिझेल संपून बसेस रद्द कराव्या लागत असल्याची माहिती एसटीच्या अधिकाऱ्यांनी दिली.