जिना मरना संग संग

By Admin | Updated: July 19, 2014 02:32 IST2014-07-19T02:32:01+5:302014-07-19T02:32:01+5:30

आजूबाजूच्या परिसरात राहाणारे ‘ते‘ दोघे

Die together with | जिना मरना संग संग

जिना मरना संग संग

सुमित-अभिजितची ‘अमर’ मैत्री : जगले एकसाथ, मृत्यूही लागोपाठ
नागपूर :
आजूबाजूच्या परिसरात राहाणारे ‘ते‘ दोघे जिवश्चकंठश्च मित्र. एकत्र खेळायचे, एकत्र फिरायचे. कामही एकसारखे आणि सोबतच करायचे. खाणेपिणेही एकत्र अन् दोघांचा बळी गेला तो एकाच अपघातात. ‘जिना मरना संग संग‘चा प्रत्यय देणारी ही घटना सुमित-अभिजित या तरुणाच्या ‘अमर‘ मैत्रीचेही प्रतीक ठरावी.
सुमित हरिश्चंद्र गिरे (वय २७, रा. मानेवाडा) आणि अभिजित ज्ञानेश्वर पाटील (वय २९, रा. उमरेड रोड नागपूर) हे दोघे मित्र. एकमेकांना जीवापाड जपणारे. सोबत खेळणे, फिरणे, खाणेपिणे आणि कामही सोबतच करणे. एकमेकांना टाकून ते कोणतेच काम करीत नव्हते. संगणकाच्या सुट्या भागाची विक्री अन् दुरुस्ती सेवा हे दोघे देत होते. याच कामाच्या निमित्ताने ते १५ जुलैला वाडीला गेले होते. रात्री ८.१५ ला सुमित आणि अभिजित मोटरसायकलवरून रविनगर चौकाकडे जात होते. त्यांच्यासमोर एक कार होती तर मागे तेलाचे पिंप भरलेला ट्रक (एमएच ३६/ एस - १५६५) होता. उतारावरून खाली उतरताच ट्रकचालकाने जास्तच गती वाढवली आणि समोरच्या दुचाकीला जबर धडक दिली.
दुचाकी समोरच्या कारवर आदळली. एवढे होऊनही ट्रकचालकाने गती कमी केली नाही. त्यामुळे ट्रक आणि कारच्या मध्ये दुचाकी आणि त्यावर बसलेले सुमित तसेच अभिजित चिरडले गेले. सुमितचा जागीच मृत्यू झाला तर अभिजितवर डॉ. पिनाक दंदे यांच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू झाले.
त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत होती. त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांनी त्याला बुधवारी सकाळी सिम्स इस्पितळात दाखल केले. डॉक्टरांनी अभिजितला बचावण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. अभिजितच्या कुटुंबीयांनी त्याच्या उपचारावर तब्बल ७ ते ८ लाख रुपये खर्च केले. मात्र, अभिजितचा प्राणप्रिय मित्र सुमित त्याच्या डोळ्यादेखतच अपघातात दगावला होता. त्यामुळेच की काय, अभिजितने उपचाराला दाद दिली नाही. आज सकाळी अभिजितने प्राण सोडला. (प्रतिनिधी)
दुसरा आघात
सुमित अभिजितची घट्ट मैत्री दोन्ही कुटुंबीयांच्या अन् एकमेकांच्या मित्रांच्याही परिचयाची होती. दिवसातील बराच वेळ ते सोबतच दिसायचे. मात्र, एकाच अपघातात त्या दोघांचाही बळी जाईल, असा कुणी विचारही केला नव्हता. सुमितच्या मृत्यूमुळे पहिला तर, अभिजितच्या मृत्यूमुळे या दोन्ही कुटुंबीयांना आणि त्यांच्या आप्तस्वकीयांना दुसरा धक्का बसला.
पाटील कुटुंबीय कोलमंडले
अभिजितचे वडील हिंगण्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत कार्यरत आहेत. त्यांना दोन मुले आणि एक मुलगी होती. १४ वर्षांपूर्वी त्याची बहीण भुसावळहून येत असताना तिचा भीषण अपघातात मृत्यू झाला होता. आता ऐन तारुण्यात असलेला अभिजित गेल्याने पाटील कुटुंबीय अक्षरश: सुन्न झाले आहे.

Web Title: Die together with

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.