डिस्काऊंटवर घेतले ‘मरण’!

By Admin | Updated: April 2, 2017 02:18 IST2017-04-02T02:18:51+5:302017-04-02T02:18:51+5:30

मानवी स्वभाव किती स्वार्थी होतोय बघा... आपण नेहमी वाढत्या प्रदूषणाविरोधात बोलतो, सरकारला दोष देतो,

'Die' taken on a discount! | डिस्काऊंटवर घेतले ‘मरण’!

डिस्काऊंटवर घेतले ‘मरण’!

नागपूर : मानवी स्वभाव किती स्वार्थी होतोय बघा... आपण नेहमी वाढत्या प्रदूषणाविरोधात बोलतो, सरकारला दोष देतो, वेळ आली तर न्यायालयाच्या निर्णयावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करतो. परंतु विषय जेव्हा स्वहिताचा असतो तेव्हा मात्र सामाजिक बांधिलकी विसरून केवळ आपल्या फायद्याचाच विचार करतो. याचा पुन्हा एक वाईट अनुभव बीएस-३ सारख्या नाकारलेल्या (बॅन) वाहनांच्या जम्बो खरेदीनंतर आला आहे. अशा स्थितीत खरंच आपल्याला प्रदूषणावर बोलण्याचा नैतिक अधिकार आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण, या स्वार्थासाठी काहींनी डिस्काऊंटच्या नादात चक्क आपले आणि पर्यायाने समाजाचेही ‘मरण’ विकत घेतले आहे.

या सर्व गाड्या पुढील दहा-वीस वर्षे अक्षरश: प्रदूषण ओकणार आहेत. मात्र हे सर्व माहीत असताना केवळ काही पैशाच्या लालसेपोटी त्या गाड्या खरेदीसाठी आपण उड्या मारल्या आणि दोनच दिवसात हजारो गाड्यांची खरेदी केली. हा स्वत:शी आणि निसर्गाशी खेळ आहे. यात आपण या गाड्या खरेदीची तारीख पाळली असली तरी त्यासोबतच आयुष्याचे टायमिंग मात्र चुकविले आहे, याचाही विचार करावा लागेल. या ज्वलंत प्रश्नावर ‘लोकमत’ ने समाजातील पर्यावरण तज्ज्ञ, डॉक्टर्स, शिक्षणतज्ज्ञ, कृषीतज्ज्ञ व वकिलांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या असता, सर्वांनी समाजाच्या या स्वार्थीवृत्तीचा विरोध केला. भारत स्टेज-३ (बीएस-३) या गाड्यांवर सर्वोच्च न्यायालयाने बंदी घालताच मागील दोन दिवसांत विविध कंपन्यांनी आपल्या डीलर्सच्या माध्यमातून ग्राहकांना डिस्काऊंटचे प्रलोभन दाखवून या सर्व गाड्यांची विक्री केली. लोकांनी सुद्धा त्या प्रलोभनाला बळी पडत, गाड्यांच्या खरेदीसाठी रांगा लावल्या. दोनच दिवसांत उपराजधानीत तब्बल ३ हजार ५०० गाड्यांची विक्री झाली. यात लोकांना निश्चितच १० ते १५ हजार रुपयांचा फायदा झाला आहे. मात्र त्या छोट्याच्या लोभापोटी संपूर्ण शहराचे आरोग्य धोक्यात टाकले. त्यामुळे भविष्यात या तीन हजार गाड्यांमधून होणाऱ्या प्रदूषणाला जबाबदार कोण राहणार,असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अगोदरच नागपुरातील प्रदूषण धोक्याच्या पातळीवर पोहोचले आहे. यात आता या हजारो गाड्या पुन्हा भर घालणार आहे. हाच समाज प्रदूषण आणि पर्यावरणाच्या मोठमोठ्या गोष्टी करतो. मात्र जेव्हा स्वत:चा स्वार्थ डोळ्यासमोर दिसतो, तेव्हा मात्र तो अशा रांगा लावतो. आज जगभरात पर्यावरण संरक्षणासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहे. यात सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा आपला देश आणि समाजाचे हित लक्षात घेऊनच हा निर्णय दिला आहे. मात्र असे असताना लोकांनी मागील दोन दिवसांत बॅन गाड्या खरेदी करून, सर्वोच्च न्यायालयाच्या अपेक्षांवर पाणी फेरले आहे. (प्रतिनिधी)

प्रदूषणावर नियंत्रणासाठी वेळोवेळी ‘बीएस’ मानके ठरवण्यात येतात. ‘बीएस’ म्हणजे ‘भारत स्टँडर्ड स्टेज’, प्रदूषणाचं केंद्राने दिलेले मानक म्हणजे ‘बीएस’. हे मानक भारतातील सर्व वाहनांसाठी लागू आहे. प्रदूषण नियंत्रणाच्या दृष्टीने नुकताच दिलेला सुप्रीम कोर्टाचा निर्णय योग्य आहे. विशेष म्हणजे,‘बीएस-४’ या वायूप्रदूषण मानकाची पूर्तता केलेल्या वाहनांचे उत्पादन व विक्री २०१० पासून होणार होती. परंतु वाहन उत्पादक कंपन्यांनी वेळोवेळी मुदतवाढ मागितल्याने सात वर्षे उलटली. आता १ एप्रिल २०१७ पासून ‘बीएस-३’ वाहनांच्या खरेदी-विक्रीवर बंदी येऊन आता केवळ ‘बीएस-४’च्याच वाहनांची नोंदणी होणार आहे. यामुळे प्रदूषणात काही प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे. परंतु प्रत्येकाने माझे वाहन प्रदूषण पसरविणार नाही याची काळजी घेतल्यास हवेतील प्रदूषण निम्म्याहून कमी होईल.
-शरद जिचकार, प्रादेशिक परिवहन अधिकारी
 

Web Title: 'Die' taken on a discount!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.