सायकोलॉजिकल टेस्ट फेल झालेल्याने चालविली होती ट्रेन ? बिलासपूर अपघातातील खळबळजनक बाब उघड
By नरेश डोंगरे | Updated: November 8, 2025 18:09 IST2025-11-08T18:03:30+5:302025-11-08T18:09:18+5:30
Nagpur : ४ नोव्हेंबर रोजी मेमू लोकल आणि मालगाडी यांची भीषण धडक झाल्याने या अपघातात लोको पायलट विद्यासागर यांच्यासह ११ जणांचा मृत्यू झाला आणि २० प्रवाशांना गंभीर दुखापत झाली आहे.

Did a person who failed the psychological test drive the train? Sensational details of the Bilaspur accident revealed
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मंगळवारी दुपारी बिलासपूरजवळ झालेल्या भीषण रेल्वे अपघातात एक खळबळजनक बाब चर्चेला आली आहे. त्यानुसार, मालगाडीला धडक देणाऱ्या मेमू लोकल ट्रेनचे लोको पायलट चार महिन्यांपूर्वी सायकोलॉजिकल टेस्ट (मानसिक चाचणी) मध्ये फेल झाले होते, अशी धक्कादायक माहिती आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या वरिष्ठ जनसंपर्क अधिकाऱ्यांनी या बाबीवर बोलण्याचे टाळले आहे, हे विशेष.
४ नोव्हेंबर रोजी मेमू लोकल आणि मालगाडी यांची भीषण धडक झाल्याने या अपघातात लोको पायलट विद्यासागर यांच्यासह ११ जणांचा मृत्यू झाला आणि २० प्रवाशांना गंभीर दुखापत झाली आहे. प्राथमिक तपासात ऑटो सिग्नलिंग सिस्टिममधील त्रुटी आणि तांत्रिक दोष पुढे आले होते. मात्र, तीन दिवसांपासून सुरू असलेल्या रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या (सीआरएस) तपासात लोको पायलटचा साकोलॉजिकल टेस्ट फेल असल्याचा मुद्दा उजेडात आल्याचे समजते.
प्राप्त माहितीनुसार, लोको पायलट विद्यासागर यांची जून २०२५ मध्ये सायकोलॉजिकल टेस्ट घेण्यात आली होती. त्यात ते नापास झाले होते. एवढा गंभीर मुद्दा दुर्लक्षित करून संबंधित वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांनी विद्यासागर यांना पॅसेंजर ट्रेन चालविण्याची जबाबदारी सोपविली. अर्थात, हजारो प्रवाशांचा जीव धोक्यात घालण्याचा हा गंभीर प्रकार दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या संबंधित शीर्षस्थ अधिकाऱ्यांनी केला, विशेष म्हणजे, रेल्वेच्या नियमानुसार ट्रेन चालकाला प्रवासी गाडी चालवण्यापूर्वी ही मानसिक चाचणी उत्तीर्ण करणे बंधनकारक असते. या चाचणीत चालकाचे मानसिक संतुलन, निर्णयक्षमता तसेच आपत्कालीन परिस्थितीत योग्य कृती करण्याची क्षमता तपासली जाते. विद्यासागर ही टेस्ट फेल असल्याचे माहीत असूनही संबंधित अधिकाऱ्यांनी एवढी गंभीर चूक कशी केली, त्याची आता चौकशी केली जात आहे. सीआरएसच्या चौकशी अहवालानंतर दपूम रेल्वेच्या बिलासपूर झोनच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही कारवाईची शक्यता वर्तविली जात आहे.