देशात पक्षाची नव्हे वर्गाची तानाशाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 01:47 AM2017-10-23T01:47:04+5:302017-10-23T01:47:14+5:30

भाजपा सत्तेवर आली तेव्हापासून देशात तानाशाही असल्याची ओरड सुरू आहे. परंतु ही केवळ एका पक्षाची तानाशाही नसून ही एका वर्गाची आहे.

The dictatorship of the class of the party is not in the country | देशात पक्षाची नव्हे वर्गाची तानाशाही

देशात पक्षाची नव्हे वर्गाची तानाशाही

Next
ठळक मुद्देमनिषा बांगर : दीक्षाभूमीवर महिला क्रांती परिषदेला सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भाजपा सत्तेवर आली तेव्हापासून देशात तानाशाही असल्याची ओरड सुरू आहे. परंतु ही केवळ एका पक्षाची तानाशाही नसून ही एका वर्गाची आहे. हे एक मोठे षड्यंत्र आहे. त्यावर धार्मिक नियंत्रण आहे. हे षड्यंत्र कुठल्याही एका राजकीय पक्षाचेही नाही. बहुजनांना हजारो वर्षे गुलाम बनवून ठेवणाºया उच्चवर्णीयांचे हे षड्यंत्र असून, देशात स्वातंत्र्यापासून त्यांचीच सत्ता आहे, असे प्रतिपादन हैदराबाद येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि बामसेफच्या महिला विंगच्या अध्यक्षा डॉ. मनीषा बांगर यांनी दीक्षाभूमी येथे केले.
२० जुलै १९४२ रोजी नागपूरच्या कस्तूरचंद पार्कवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत दलित महिलांनी पहिल्यांदा स्वतंत्ररीत्या राष्ट्रीयस्तरावर महिला परिषद आयोजित केली होती. या परिषदेला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. तेव्हा परिषदेच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त लॉर्ड बुद्धा मैत्री संघ व संथागार फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दीक्षाभूमीवर तीन दिवसीय अ.भा. महिला क्रांती परिषद आयोजित करण्यात आली आहे. रविवारी या परिषदेचे उद्घाटन गुजरातच्या सामाजिक कार्यकर्त्या मंजुला प्रदीप यांच्या हस्ते करण्यात आले. तेव्हा अध्यक्षस्थानावरून डॉ. बांगर बोलत होत्या. यावेळी लॉर्ड बुद्धा टीव्हीचे संचालक भय्याजी खैरकर, सामाजिक न्याय विभागाचे उपसंचालक सिद्धार्थ गायकवाड, गजाला खान, शरयू तायवाडे, सचिन मून, वामन सोमकुंवर, ममता बोदेले, प्रा. माधुरी गायधनी, सुषमा भड, वंदना वनकर व्यासपीठावर उपस्थित होत्या.
डॉ. मनीषा बांगर म्हणाल्या, स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे झाली, परंतु आजही दलित, आदिवासी, ओबीसींसह मूळ निवासी यांचे प्रश्न सुटलेले नाही. कुपोषण, शिक्षण, बेरोजगारी या समस्या या वर्गामध्येच दिसून येतात. आरक्षणाच्या नावावर मागासवर्गीयांना डिवचले जाते. परंतु गेल्या ७० वर्षांत ३ टक्के सवर्ण हे १०० टक्के आरक्षण घेत आहेत, हे आम्हाला कधी समजलेच नाही. आता कुठे शिक्षणामुळे ते कळू लागले आहे. ही व्यवस्था कुणी निर्माण केली. कायदेमंडळ, प्रशासन, न्यायपालिका आणि मीडिया यात एकाच वर्गाच्या लोकांची भरती स्वातंत्र्यापासूनच सुरू झाली. आज हे चारही क्षेत्र केवळ एकाच वर्गाने ठासून भरली आहेत. याची सुरुवात काँग्रेसनेच केली. भांडवलशाही ही काँग्रेसनेच आणली. तेव्हा केवळ भाजपाला दोष देऊन चालणार नाही. बहुजनांवर गुलामी लादण्याचे काम एका पक्षाने नव्हे तर एका विचाराने केले आहे.
ती मनुवादी विचारसरणी असून, ती विविध पक्षात कार्यरत आहे. आजची लढाई ही केवळ आरक्षणाची लढाई नसून, स्वातंत्र्याची लढाई आहे. तेव्हा दलित, आदिवासी, ओबीसी व मूळ निवासी यांनी एकत्र येऊन या शक्तीविरुद्ध एकजूट होऊन लढण्याची गरज आहे, असे आवाहन त्यांनी केले. सिद्धार्थ गायकवाड यांनी या महिला परिषदेतून महिलांची एक देशव्यापी चळवळ उभी राहावी, असे आवाहन केले. १९४२ च्या महिला क्रांती परिषदेत महत्त्वाची भूमिका बजावणाºया महिलांच्या वंशाजांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यात सुधाकर चौधरी, सिद्धार्थ कांबळे, इच्छा वालदे यांचा समावेश होता. पुष्पाताई बौद्ध यांनी संविधान प्रास्ताविकेचे वाचन केले.प्रास्ताविक संथागार फाऊंडेशनचे संस्थापक एम. एस. जांभुळे यांनी केले. डॉ. वीणा राऊत यांनी संचालन केले. डॉ. सरोज आगलावे यांनी आभार मानले.

फुले-शाहू-आंबेडकरी विचारांच्या
महिलाच देशात बदल घडवू शकतात
देशात आजही महिलांवर अन्याय, अत्याचार होत आहेत. महिलांची विक्री केली जात आहे. स्वातंत्र्याच्या ७० वर्षांनंतरची ही भयावह परिस्थिती आहे. हे चित्र केवळ फुले, शाहू आंबेडकरी विचारांच्या महिलांमुळेच बदलू शकते. तेव्हा अशा विचारांच्या देशभरातील महिलांना एकजूट करण्याची गरज आहे, असे मत भय्याजी खैरकर यांनी व्यक्त केले.
देशात भगवेकरण सुरू
हा देश लोकशाही मानणारा आहे. परंतु देशात सध्या भगवेकरण सुरू आहे. एकाच धर्माचे विचार लादले जात आहेत. याविरुद्ध आवाज उचलण्याची गरज आहे. देशात खैरलांजी, उना किंवा सहारनपूरची घटना पुन्हा होऊ नये म्हणून एक शक्ती निर्माण करण्याची गरज आहे, असे मंजुला प्रदीप यांनी आपल्या उद्घाटनीय भाषणात सांगितले.

आज या विषयांवर होणार चर्चा
महिला क्रांती परिषदेत सोमवारी सकाळी १० वाजता पहिल्या सत्रात एस.सी., एस.टी. ओबीसी व अल्पसंख्याक आणि भारतीय संविधान या विषयावर जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्षा वैशाली डोळस यांच्या अध्यक्षतेखाली चर्चा होईल. डॉ. सुनंदा वालदे, अ‍ॅड. निर्मल सोनी, जिजा राठोड या विचार व्यक्त करतील. सेवानिवृत्त अतिरिक्त जिल्हाधिकारी पंजाबराव वानखेडे आपली प्रतिक्रिया व्यक्त करतील. दुसºया सत्रात डॉ. प्रतिभा अहिरे, स्मिता पानसरे, जेबुन्निसा शेख, डॉ. माधुरी थोरात, विविध विषयांवर आपले विचार व्यक्त करतील. ई.झेड. खोब्रागडे हे यावर आपले विचार व्यक्त करतील. त्यानंतर तामिळनाडू, केरळ, छत्तीसगड, महाराष्ट्र, राजस्थान, आंध्र प्रदेशसह विविध राज्यात सुरू असलेल्या विविध महिला चळवळी व त्यासंबंधातील कामांची माहिती सादर केली जाईल.
शबाना आझमी नसल्याने निराशा
परिषदेचे उद्घाटन सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री शबाना आझमी यांच्या हस्ते होणार होते. तसेच बडोद्याचे राजे सयाजीराव गायकवाड यांची सून राजमाता शुभांगिनीदेवी गायकवाड प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार होत्या. परंतु या दोघीही नसल्याने उपस्थितांची निराशा झाली. या कार्यक्रमाबाबत त्या दोघींना माहितच नसल्याची यावेळी चर्चा होती. आयोजकाकडून निमंत्रण देण्यात आल्याचे सांगण्यात आले.

Web Title: The dictatorship of the class of the party is not in the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.