Diamond and gold jewelery stolen in Pratap Nagar of Nagpur | नागपुरातील प्रतापनगरात हिरे-सोन्याचे दागिने लंपास
नागपुरातील प्रतापनगरात हिरे-सोन्याचे दागिने लंपास

ठळक मुद्देधाडसी चोरी : तीन आठवड्यानंतर तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दीनदयालनगरात राहणाऱ्या अलका उदय नायक (वय ५५) यांच्या घरातून हिरे तसेच सोन्याचे दागिने चोरट्याने लंपास केले. तीन आठवड्यांपूर्वी घडलेल्या या घटनेची तक्रार त्यांनी बुधवारी दिल्यानंतर पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला.
नायक यांचे फ्रेण्डस सोसायटीत निवासस्थान आहे. २३ एप्रिल ते ४ मे दरम्यान त्यांच्या नातेवाईकांकडे कार्यक्रम होता. त्यामुळे त्या तिकडेच व्यस्त होत्या. या कालावधीत त्यांच्याकडचे हिऱ्याचे तसेच सोन्याचे दागिने चोरीला गेले. ही घटना लक्षात आल्यानंतर अलका नायक यांनी आपल्या नातेवाईक तसेच घरातील नोकरांना याबाबत विचारणा केली. कुणीच काही माहिती दिली नसल्यामुळे अखेर बुधवारी प्रतापनगर ठाण्यात तक्रार नोंदवली. चोरीला गेलेल्या दागिन्यांची किंमत ४ लाख, ३६ हजार रुपये आहे. हे दागिने ड्रेसिंग टेबलच्या ड्रॉवरमध्ये ठेवून होते. विशेष म्हणजे, उपरोक्त कालावधीत त्यांच्याकडे पाहुण्यांची वर्दळ होती. त्यामुळे दागिने त्यांच्या घरी आलेल्या पाहुण्यांपैकी कुणी चोरले की घरात काम करणाऱ्या नोकराने ते लंपास केले, हे कळायला मार्ग नाही. नायक यांनी दिलेल्या तक्रारीवरून प्रतापनगरचे एएसआय शेषराव कामडी यांनी चोरीचा गुन्हा दाखल केला. चोरट्याचा शोध घेतला जात आहे.


Web Title: Diamond and gold jewelery stolen in Pratap Nagar of Nagpur
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.