धूम स्टाईल मोबाईल पळविला, विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात
By दयानंद पाईकराव | Updated: July 6, 2024 17:22 IST2024-07-06T17:21:20+5:302024-07-06T17:22:43+5:30
एक फरार : गुन्हे शाखेच्या युनिट १ ची कामगिरी

Dhoom style mobile phone stolen, legal conflict child detained
नागपूर : पायदळ जात असलेल्या महिलेचा दुचाकीवरून आलेल्या दोन आरोपींनी धूम स्टाईलने मोबाईल चोरी केला होता. यातील विधीसंघर्षग्रस्त बालकाला गुन्हे शाखेच्या युनिट १ ने ताब्यात घेतले असून त्याचा साथीदार अद्यापही फरार आहे.
बजाजनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत रविवारी ३० जून २०२४ रोजी दुपारी १२.३० वाजता सुचिता संदिप मराठे (४९, रा. शास्त्री ले आऊट, खामला) या आपल्या मेत्रीणीसोबत टीजीसी हॉटेलसमोर बजाजनगर चौक येथून पायदळ जात होत्या. तेवढ्यात दुचाकीवरून आलेल्या दोन आरोपींनी त्यांच्या हातातील पर्स हिसकावून पळ काढला. पर्समध्ये त्यांचा मोबाईल होता. या प्रकरणी त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून बजाजनगर पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध कलम ३९२, ३४ नुसार गुन्हा दाखल केला होता.
गुन्ह्याच्या समांतर तपासात गुन्हे शाखेच्या युनिट एकचे निरीक्षक सुहास चौधरी, सहायक पोलिस निरीक्षक सचिन भोंडे, हवालदार हेमंत लोणारे, नितीन वासनिक, शरद चांभारे, रवींद्र खेडेकर, मनोज टेकाम यांनी मिळालेली माहिती व तांत्रीक तपास करून एका विधीसंघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेतले. त्याची पालकासमोर चौकशी केली असता त्याने आपला साथीदार यश संजय खुडे (२१, रा. इमामवाडा) याच्यासोबत मिळून चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्या ताब्यातून चोरी केलेला मोबाईल व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकुण १८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यातील फरार आरोपीचा बजाजनगर पोलीस शोध घेत आहेत.