योगेश पांडे - नागपूरलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे वादात सापडलेल्या धनंजय मुंडे यांच्या मंत्रीपदाच्या राजिनाम्यानंतर विविध प्रतिक्रिया येत आहेत. त्यांच्या भगिनी व राज्याच्या पशुसंवर्धनमंत्री पंकजा मुंडे यांनी या राजिनाम्याचे स्वागत करत भाजपच्या वरिष्ठांना चिमटा काढला आहे. मुळात मुंडे यांना मंत्रीपदाची शपथच द्यायला नको होती. असे झाले असले तर पुढील प्रकार टळला असता. शिवाय त्यांचा राजिनामादेखील अगोदरच घ्यायला हवा होता, या शब्दांत पंकजा मुंडे यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. नागपुरात मंगळवारी त्या प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.
धनंजय मुंडे यांचा राजिनाम्याच्या निर्णय योग्य आहे. त्याचे मी स्वागत करते योग्य निर्णय. देर आए दुरुस्त आए असेच म्हणावे लागेल. मुळात त्यांचा राजिनामा अगोदर घेण्यात यायला हवा होता, असे पंकजा मुंडे म्हणाल्या. संतोष देशमुख हत्याप्रकरण माणुसकीच्या दृष्टीने महत्त्वाचा विषय आहे. त्यांच्या हत्येबाबत काही व्हिडीओ व्हायरल झाले. मात्र ते व्हिडीओ उघडण्याची किंवा बघायची माझी हिंमतच झाली नाही. ज्यांनी त्यांना अमानुषपणे मारले व व्हिडीओ केला ते अमानवीयच म्हणावे लागतील.संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मी मुख्यमंत्र्यांना पत्र दिले होते. यात कोण सहभागी आहे व कुणाचा हात आहे हे तपास यंत्रणेचे काम आहे. मी त्यात हस्तक्षेप करण्याचे कारण नाही. परंतु ज्या मुलांनी ही हत्या केली आहे त्यांच्यामुळे संपूर्ण राज्यातील त्यांचा समाज मान खाली घालून वावरत आहे. समाज व जात यावर तशी तर बोलायची गरज नाही. मात्र आजकाल प्रत्येक गोष्ट जातीवरच जाते. अमानुषपणे हत्या करणाऱ्या गुन्हेगाराला कुठलीही जात नसते. तसेच निर्णय घेणाऱ्या राज्यकर्त्यालादेखील जात नसते. मंत्र्यांनी कुणाबाबतही कुठलाही ममत्वभाव, आकस व द्वेष न बाळगता काम केले पाहिजे. मंत्र्यांनी खुर्चीवर बसल्यावर सर्वांचा विचार केला पाहिजे. आरोपी माझे मुलं असती तरी मी हेच म्हटले असते की त्यांना कडक शिक्षा व्हायला हवी. संतोष देशमुख यांच्या आईची मनापासून क्षमा मागते, असे प्रतिपादन पंकजा मुंडे यांनी केले.