डीजी, जीआरपींची संकल्पना; नागपुरात मिशन ट्रस्टेड पुलिसिंग !

By नरेश डोंगरे | Published: January 11, 2024 08:59 PM2024-01-11T20:59:11+5:302024-01-11T20:59:48+5:30

अभिनव उपक्रम : तक्रारकर्त्यांना क्यूआर कोडवर नोंदविता येणार प्रतिक्रिया

DG, concept of GRPs; Mission Trusted Policing in Nagpur! | डीजी, जीआरपींची संकल्पना; नागपुरात मिशन ट्रस्टेड पुलिसिंग !

डीजी, जीआरपींची संकल्पना; नागपुरात मिशन ट्रस्टेड पुलिसिंग !

नागपूर : गाडीत किंवा रेल्वेस्थानक परिसरात कसल्याही स्वरूपाचा गुन्हा घडल्यानंतर पोलिसांकडून त्या संबंधाने कशा पद्धतीने कारवाई करण्यात आली, किंवा तक्रारकर्त्यांना रेल्वे पोलिसांकडून कशी वागणूक मिळाली, त्याबद्दलचे चांगले- वाईट मत, प्रतिक्रिया बेधडकपणे तक्रारकर्ते रेल्वे पोलिसच्या शिर्षस्थांपर्यंत पोहचवू शकणार आहेत. त्यासाठी तक्रारकर्त्यांना एक क्यूआर कोड उपलब्ध करून देण्यात आला असून रेल्वे पोलीस महासंचालक (डीजी जीआरपी) डॉ. प्रज्ञा सरवदे यांच्या संकल्पनेतून हा अभिनव उपक्रम बुधवारी राज्यात सुरू करण्यात आला.

धावत्या रेल्वेत गर्दीचा गैरफायदा उठवून चोर-भामटे प्रवाशांची रोख रक्कम, माैल्यवान चिजवस्तू लंपास करतात. वाद घालून मारहाण करतात. अनेक समाजकंटक महिलांशी अश्लिल चाळे करून छेड काढतात. कुणाची लहान मुले प्रवाशांच्या गर्दीत हरवितात तर काही ठिकाणी संधी साधून समाजकंटक त्यांचे अपहरण करतात. काही ठिकाणी अज्ञाताकडून संशयास्पद वस्तू ठेवून घातपात घडवून आणण्याचे प्रयत्न होतात. कुठे अपघात होतो तर कुणी आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतो. या तसेच अन्य प्रकारच्या संबंधाने तक्रार नोंदविल्यानंतर पोलीस त्याची कशी दखल घेतात. तातडीने गुन्ह्यांची उकल करून पीडिताला कशा पद्धतीने दिलासा देतात, हे अनेकदा कळतच नाही. अनेक प्रकरणात पोलीस गंभीर नसतात, तत्परता दाखवली जात नाही, असेही आरोप होतात. नाहक मनस्ताप नको म्हणून अनेक जण तक्रार करण्याचेही टाळतात. हे सर्व प्रकार लक्षात घेऊन पोलीस महासंचालक (रेल्वे पोलीस) डॉ. प्रज्ञा सरवदे यांनी रेल्वे पोलिसांच्या कार्यपद्धती विषयी विश्वासार्ह्यता निर्माण करण्यासाठी 'मिशन ट्रस्टेड पोलिसिंग' हा उपक्रम सुरू केला आहे. त्यानुसार, रेल्वे पोलिसांकडे तक्रार करणाऱ्यांना १० जानेवारीपासून रेल्वेच्या पोलीस ठाण्यात क्यूआर कोड उपलब्ध करून देण्यात आला आहे. हा कोड स्कॅन करताच तक्रारकर्त्यांना फिडबॅक फॉर्मवर त्यांचे अभिप्राय नोंदवता येणार आहे.

रेल्वे पोलिसांना गतीमान करण्याचे उद्दिष्ट !
रेल्वे पोलिसांना कार्यतत्पर आणि गतीमान करण्याचा उद्देश या उपक्रमामागे आहे. त्यानुसार, गुन्हा घडल्याच्या दोन तासात एफआयआर दाखल करणे आवश्यक आहे. महिलांची छेड काढणाऱ्या गुन्हेगाराला तातडीने पकडणे, हरविलेल्या किंवा अपहरण झालेल्या मुलांबाबतची तक्रार मिळाल्याच्या एक तासात पोलिसांनी काय कारवाई केली, मुलांना शोधून काढले का, संशयितांना पकडले का, त्यांच्यावर कसली कारवाई केली, रेल्वेचे अपघात किंवा आत्महत्या रोखण्यासाठी काय कारवाई केली, संशयास्पद वस्तू ताब्यात घेऊन घातपात रोखण्यासाठी काय प्रयत्न केले, ते सर्व वरिष्ठांच्या नजरेत यावे, हासुद्धा उद्देश या उपक्रमाच्या मागे आहे.

सहा पोलीस स्टेशन, सात आऊटपोस्ट
नागपूर रेल्वे पोलिसांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या नागपूर, गोंदिया, ईतवारी, वर्धा, बडनेरा आणि अकोला अशा सहा रेल्वे पोलीस ठाण्यात तसेच या ठाण्याअंतर्गत येणाऱ्या भंडारा, नागभिड, अजनी, बल्लारशाह, अमरावती, वाशिम आणि मुर्तीजापूर या सात आऊटपोस्टमध्ये तक्रारकर्त्यांसाठी क्यूआर कोडचा उपक्रम बुधवारपासून सुरू झालेला आहे. तक्रारदारांनी आपला अभिप्राय नोंदवावा, असे आवाहन रेल्वेचे पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे यांनी केले आहे.

Web Title: DG, concept of GRPs; Mission Trusted Policing in Nagpur!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.