आमचे विरोधक देव पाण्यात ठेवून बसले होते, पण.. फडणवीसांचा विरोधकांना टोमणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2022 18:19 IST2022-03-17T13:23:09+5:302022-03-17T18:19:35+5:30
महाविकास आघाडी सरकारचा बुरखा आम्ही टराटरा फाडतोय. ही महाविकास आघाडी नाहीतर महावसुली आघाडी आहे, असे फडणवीस म्हणाले.

आमचे विरोधक देव पाण्यात ठेवून बसले होते, पण.. फडणवीसांचा विरोधकांना टोमणा
नागपूर : काँग्रेस आणि इतर पक्ष जनतेपासून तुटलेले आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादीची लढाई नोटाशी होती. नोटाला देखील त्यांच्यापेक्षा चांगली मते मिळाली, असा खोचक टोला फडणवीसांनी यावेळी लगावला. गोवा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या यशानंतर आज (दि. १७) नागपुरात देवेंद्र फडणवीस यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
फडणवीस म्हणाले, या स्वागताबद्दल सर्वांचे मनापासून आभार, आपले स्वागत मनापासून स्वीकारतो, अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली. गोव्याच्या जनतेने आम्हाला निवडून दिले. पण, हा विजय माझ्या एकट्याचा नाही, तर भाजपचा आहे. गोव्यात काम करण्याची संधी मला मिळाली, त्यासाठी मी भाजपचा आभारी आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. आपल्यासारख्या कार्यकर्त्यांच्या मदतीमुळेच हे यश मिळाले. आमचे विरोधक देव पाण्यात घालून बसले होते. पण, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा सर्वच त्यांच्या हातातून गेलं. त्यांचं स्वप्न स्वप्नच राहिलं. 'मुंगेरीलाल के हसीन सपने' फक्त राहिले, असा टोमणा फडणवीसांनी लगावला.
महाविकास आघाडी सरकारचा बुरखा आम्ही टराटरा फाडतोय. ही महाविकास आघाडी नाहीतर महावसुली आघाडी आहे. यांचे दोन मंत्री तुरुंगात आहे. आमच्या नेत्यांविरोधात खोट्या केसेसे दाखल झाल्या. पण, यांनी कितीही कारवाया केल्या तरी आम्ही शांत बसणार नाही. यांचा भ्रष्टाचारी चेहरा समोर जनतेसमोर आणल्याशिवाय राहणार नाही, असेही फडणवीस म्हणाले.
यासोबतच, होऊ घातलेल्या महापालिका, जिल्हा परिषद निवडणुका असो. तिथे भाजपचाच झेंडा फडकेल. २०२४ ला भाजप स्वबळावर सरकार स्थापन करेल, असेही सुचूक वक्तव्य फडणवीस यांनी केले. यावेळी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, नागपूरचे महापौर दयाशंकर तिवारी, प्रविण दटके व भाजपचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.