विरोधकांना सोबत घेऊन करणार विकास : नवनियुक्त पालकमंत्री नितीन राऊत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 22:33 IST2020-01-08T22:32:15+5:302020-01-08T22:33:34+5:30
विकासाच्या प्रवाहात विरोधकांनादेखील सोबत घेण्यात येईल, असे मत राज्याचे ऊर्जामंत्री व जिल्ह्याचे नवनियुक्त पालकमंत्री नितीन राऊत यांनी व्यक्त केले. पालकमंत्रिपदी नियुक्ती झाल्यानंतर ‘लोकमत’शी बोलताना त्यांनी आपली भावना मांडली.

विरोधकांना सोबत घेऊन करणार विकास : नवनियुक्त पालकमंत्री नितीन राऊत
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर जिल्ह्याच्या विकासासाठी सामूहिक प्रयत्न केले जातील. विशेषत: जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्तीची मिळकत वाढविण्यावर भर देण्यात येईल. सरकारी योजनांना सर्व नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येईल. विकासाच्या प्रवाहात विरोधकांनादेखील सोबत घेण्यात येईल, असे मत राज्याचे ऊर्जामंत्री व जिल्ह्याचे नवनियुक्त पालकमंत्री नितीन राऊत यांनी व्यक्त केले. पालकमंत्रिपदी नियुक्ती झाल्यानंतर ‘लोकमत’शी बोलताना त्यांनी आपली भावना मांडली.
नागपूर जिल्ह्याच्या विकासासाठी पर्यटन एक मोठे साधन होऊ शकते. ‘बुद्धिस्ट थीम पार्क’च्या संकल्पनेला साकार करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. भारतात येणाऱ्या पर्यटकांपैकी ८० टक्के दक्षिण पूर्व आशियातील असतात. ‘बुद्धिस्ट थीम पार्क’ बनल्याने ते पर्यटक नागपूरकडे आकर्षित होतील. त्याचप्रमाणे गोरेवाडा प्राणिसंग्रहालयाच्या कामाला गती देऊन त्याला लवकरात लवकर सुरू करण्यावर भर असेल. यामुळे नागपूर शहराला एक मोठे केंद्र म्हणून विकसित करण्याकडे मोठे पाऊल पडेल, असे नितीन राऊत म्हणाले.
नागपूर शहराला ‘वर्ल्ड क्लास’ शहर बनवून रोजगाराच्या नवीन संधी शोधण्यासाठी विशेष नियोजन करण्यात येईल. ‘मिहान’मध्ये नवीन कंपन्या याव्यात व जिल्ह्यात उद्योगांना आकर्षित करण्यासाठी ‘रोड मॅप’ तयार होईल. नवीन उद्योग आल्यामुळे रोजगाराच्या संधी तर वाढतीलच शिवाय ‘जीडीपी’देखील वाढेल, असे त्यांनी सांगितले.
नदी-तलावांवर विशेष लक्ष
गांधीसागर, सोनेगावसह शहरातील तलावांवर विशेष लक्ष देण्यात येईल. पिवळी नदी तसेच नागनदीच्या स्वच्छतेसंदर्भात थंड पडलेल्या योजनांना गती देण्यात येईल, असा दावादेखील नितीन राऊत यांनी केला.
असाही योगायोग, ऊर्जामंत्र्यांनाच पालकमंत्रिपद
मागील युती सरकारच्या कार्यकाळात ऊर्जामंत्री असलेले चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडेच नागपूर जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी होती. महाविकास आघाडी सरकारमध्ये ऊर्जामंत्रिपद नितीन राऊत यांच्यारुपाने परत नागपूर जिल्ह्याकडे आले. योगायोग म्हणजे परत एकदा ऊर्जामंत्र्यांकडेच जिल्ह्याचे पालकमंत्रिपददेखील आले. हा एक मोठा योगायोगच असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.