लोकशाहीच्या चार स्तंभाच्या कार्यातूनच समाजाचा विकास

By Admin | Updated: December 17, 2015 03:12 IST2015-12-17T03:12:02+5:302015-12-17T03:12:02+5:30

लोकशाहीत राजकारण, न्यायव्यवस्था, प्रशासन आणि प्रसारमाध्यमे या चारही स्तंभांचे काम अतिशय महत्त्वाचे आहे.

The development of society through four pillars of democracy | लोकशाहीच्या चार स्तंभाच्या कार्यातूनच समाजाचा विकास

लोकशाहीच्या चार स्तंभाच्या कार्यातूनच समाजाचा विकास

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : पां. वा. गाडगीळ व बाबा दळवी स्मृती पत्रकारिता पुरस्काराचे थाटात वितरण
नागपूर : लोकशाहीत राजकारण, न्यायव्यवस्था, प्रशासन आणि प्रसारमाध्यमे या चारही स्तंभांचे काम अतिशय महत्त्वाचे आहे. या प्रत्येकाजवळ स्वत:ची अशी एक सत्ता आहे. त्यामुळेच प्रत्येक स्तंभाच्या सत्तेने आपले कार्य समाजाच्या कल्याणासाठीच केले पाहिजे. लोकशाहीचे हे चारही स्तंभ मजबूत असेल तर समाजाचा विकास गतीने साधता येणे शक्य आहे. यात प्रसारमाध्यमांची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे; कारण प्रसारमाध्यमांचा प्रभाव इतर तीन स्तंभांवर पडतो, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी व्यक्त केले.

लोकमततर्फे घेतल्या जाणाऱ्या पत्रपंडित पां.वा. गाडगीळ स्मृती आर्थिक-विकासात्मक लेखन आणि पत्रमहर्षी म.य. उपाख्य बाबा दळवी स्मृती शोधपत्रकारिता स्पर्धेतील विजेत्यांना आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी विशेष अतिथी म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी शालेय शिक्षणमंत्री आणि लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा होते. प्रमुख अतिथी म्हणून मंचावर लोकमतच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन खासदार विजय दर्डा, कौन्सिल फॉर इंडियन फॉरेन पॉलिसीचे अध्यक्ष डॉ. वेदप्रकाश वैदिक, ऊर्जामंत्री व नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, लोकमतचे संपादक सुरेश द्वादशीवार, लोकमत नागपूरचे संपादक दिलीप तिखिले, लोकमत समाचारचे संपादक विकास मिश्र उपस्थित होते. कार्यक्रमात ‘आजची पत्रकारिता आणि शासन’ विषयावर वेदप्रकाश वैदिक यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम साई सभागृह, शंकरनगर येथे सायंकाळी ७.३० वाजता आयोजित करण्यात आला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, लोकमतने राज्याच्या कानाकोपऱ्यात एक लोकप्रिय वृत्तपत्र म्हणून पोहोचण्याचा प्रयत्न केला. केवळ वृत्तपत्र म्हणून न राहता लोकमतने एका सामाजिक चळवळीचे स्वरूप घेतले आणि समाजातील तळागाळातल्या माणसांच्या वेदना मांडण्याचे काम केले. त्यामुळेच हे वृत्तपत्र लोकप्रिय होऊ शकले आणि लोकांचा विश्वास जिंकू शकले. या पुरस्कार समारंभाच्या निमित्ताने ज्यांना पुरस्कार मिळाला त्यांचे लेखन उल्लेखनीय आहे. समाजातील अखेरच्या माणसाच्या प्रश्नांकडे, वेदनेकडे लक्ष वेधण्याचे काम या विजेत्यांनी केले आहे. विरोधी पक्षाला विधानभवनात आपले म्हणणे मांडण्यासाठी वृत्तपत्र हाच महत्त्वाचा स्रोत असतो. त्यामुळेच पत्रकारिता निर्भीड आणि सत्यावर आधारित असली पाहिजे. आपण जे लिहितो आहोत त्याने समाजाचे काय भले होणार? याचा विचार पत्रकारितेने केला पाहिजे. पां.वा. गाडगीळ आणि बाबा दळवी यांनी समाजाभिमुख पत्रकारिता केली. त्यांनी पत्रकारितेचा आदर्श निर्माण केला. त्यांच्या नावाने असलेल्या या पुरस्कारासह त्यांच्या आदर्शाचीही प्रेरणा सर्व विजेत्यांनी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन लोकमत मुंबईचे वरिष्ठ सहायक संपादक अतुल कुलकर्णी यांनी तर आभार लोकमत नागपूरचे संपादक दिलीप तिखिले यांनी मानले. (प्रतिनिधी)

लोकमत हे केवळ वृत्तपत्र नाही
तर उज्ज्वल परंपरा- सुरेश द्वादशीवार

लोकमत हे केवळ वृत्तपत्र नाही तर एक उज्ज्वल परंपरा आहे. लोकमान्य टिळकांनी या वृत्तपत्राला लोकमत हे नाव दिले. लोकनायक बापूजी अणे यांनी लोकमत हे साप्ताहिक चालविले आणि त्यानंतर श्रद्धेय जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजींनी ते अर्धसाप्ताहिक आणि दैनिक केले. यामागे देशाच्या स्वातंत्र्यलढ्याची, प्रबोधनाची आणि सामाजिक दायित्वाची परंपरा आहे. त्यामागे एक इतिहास आहे. या परंपरेच्यावतीने विजेत्या पत्रकारांचा सत्कार होत आहे, ही अतिशय महत्त्वाची बाब असल्याचे मत लोकमतचे संपादक सुरेश द्वादशीवार यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र फाऊंडेशनच्यावतीने ललित आणि वैचारिक साहित्यातील उल्लेखनीय कार्यासाठी देण्यात येणारा साहित्य जीवनगौरव पुरस्कार सुरेश द्वादशीवार यांना जाहीर झाला. यानिमित्त कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

Web Title: The development of society through four pillars of democracy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.